विंगकरांना सतावतेय मोकाट कुत्र्यांची दहशत; हल्ल्याच्या घडताहेत घटना!

विलास खबाले
Sunday, 18 October 2020

विंगसह परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेकदा पशुपक्ष्यांवर हल्ल्याच्या घटना येथे घडल्या आहेत. विशेषतः पाळीव शेळ्या व कोंबड्यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. ग्रामस्थांचे नुकसान त्यात झाले आहे. अशा घटनेत ती थेट घरात घुसत असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण होत आहे. लहान मुलांच्या अंगावर धावून गेल्याच्या घटनाही येथे चर्चेत आहेत.

विंग (जि. सातारा) : मोकाट कुत्र्यांचा उपद्रव येथे नित्याचाच बनला आहे. टोळक्‍या-टोळक्‍यांनी ती फिरत असून, थेट रस्त्यावरच वावर वाढल्यामुळे भीती निर्माण होत आहे. त्यांना आवर घाला, अथवा कायमचा बंदोबस्त करा, असाच सूर नागरिकांतून वारंवार येत आहे. 

विंगसह परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेक दिवसांपासून हा प्रश्न कायम आहे. ठिकठिकाणी टोळक्‍याने ती दृष्टीस पडत आहेत. एकेका टोळक्‍यात लहान-मोठी 15 ते 20 कुत्री आहेत. गल्ली बोळातून आता ती थेट रस्त्यावर उतरली आहेत. त्यातच ती आक्रमकही बनली आहेत. दोन टोळक्‍यांत अनेकदा भांडणाचे प्रसंग समोर येत आहेत. हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अनेकदा थेट अंगावर धावून येऊ लागल्याने भीती निर्माण झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी चौकाचौकांत शासकीय कार्यालयांसमोर त्यांचा बिनधास्त वावर दिसून येतो. वाहनाच्या आड अचानकपणे ती येऊ लागली आहेत. अपघाताची शक्‍यता त्यामुळे वाढली आहे. किरकोळ अपघातांच्या घटनाही येथे घडल्या आहेत. 

पालिकेत कुत्री सोडण्याचा नगरसेविकेचा इशारा

अनेकदा पशुपक्ष्यांवर हल्ल्याच्या घटना येथे घडल्या आहेत. विशेषतः पाळीव शेळ्या व कोंबड्यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. ग्रामस्थांचे नुकसान त्यात झाले आहे. अशा घटनेत ती थेट घरात घुसत असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण होत आहे. लहान मुलांच्या अंगावर धावून गेल्याच्या घटनाही येथे चर्चेत आहेत. विशेषतः लहान मुलांना त्याच्यांपासून धोका वाढला आहे. पालकांच्या काळजाचा ठोका मात्र चुकत आहे. एखादी घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल वारंवार उपस्थित केला जातो आहे. टोळक्‍यात काही पाळीव कुत्रीदेखील सामील झाली आहेत. दिवसेंदिवस आकडा त्यांचा वाढतच चालला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Street Dogs increased Ving Village Satara News