esakal | पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश; साताऱ्यात कडक Lockdown, सर्व दुकाने बंद!
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश; साताऱ्यात कडक Lockdown, सर्व दुकाने बंद!

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने साखळी तोडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (मंगळवार) पासून दहा मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये मेडिकलची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत सकाळी सात ते अकरा यावेळेत घरपोच सुविधा देता येणार आहे. कृषी अवजारे व शेती उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी सात ते अकरा यावेळेतच सुरू राहतील. या दुकानांची घरपोच सुविधा सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12 ते रात्री आठ यावेळेत तर मद्य विक्री दुपारी 12 ते सायंकाळी पाच यावेळेतच घरपोच सुविधा सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकिय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार मकरंद पाटील, शशीकांत शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काही महत्वपूर्ण सूचना केल्या. लॉकडाऊन असूनही वाढत चाललेली गर्दी रोखण्यासाठी तातडीने कडक निर्बंध लागू करण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. त्यानुसार सायंकाळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी नवे निर्बंध लागू केले. यामध्ये उद्या (मंगळवार) सकाळी सात पासून दहा मेपर्यंत हे कडक निर्बंध लागू राहणार आहेत.

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! नव्या रेकॉर्डसह जिल्ह्यात 2502 बाधित, तर 36 जणांचा मृत्यू

या कालावधीत सर्व किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, आदी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी विक्रीची दुकाने, पाळीव प्राण्याच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. या कालावधीत या दुकानांची घरपोच सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच कृषी अवजारे व शेतीतील उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी सात ते अकरा यावेळेतच सुरू राहतील. या दुकानांची घरपोच सुविधा सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू ठेवता येणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12 ते रात्री आठ यावेळेत सुरू राहतील. मद्य विक्रीबाबत दुपारी 12 ते सायंकाळी पाच यावेळेतच घरपोच सुविधा सुरू राहिल. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहिता, साथरोग अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असेही प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Balkrishna Madhale

loading image