पट्ट्यांनो..! मॅटवर कुस्तीचा सराव करा!

हेमंत पवार
सोमवार, 13 जुलै 2020

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून कोडोलीत कुस्ती मॅटचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते वितरण झाले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी उदयन्मुख कुस्तीपटूंना मॅटवर सराव करण्याचे आवाहन केले. 
 

कऱ्हाड (जि. सातारा) ः कुस्ती हा फार वर्षांपासून खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. या खेळात डाव, चपळता, निर्णय क्षमता महत्त्वाची असते. भारतासह अनेक देशांत हा खेळ लोकप्रिय आहे. कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा मॅटवर होतात. त्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंचा मॅटवर सराव होणे आवश्‍यक आहे, असे मत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. 

कोडोली (ता. कऱ्हाड) येथे क्रीडांगण विकास अनुदानातून मंजूर झालेल्या कुस्ती मॅटच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, वस्ताद शिवराज मोरे, हिंदकेसरी संतोष वेताळ, वस्ताद बाजीराव शेवाळे, कोडोलीचे सरपंच सूर्यकांत सुतार, उपसरपंच घनश्‍याम जगताप, विक्रम थोरात, बाळासाहेब जगताप, सोपानराव जगताप, अशोक जगताप, जनरल चॅम्पियन अनिकेत वाघमोडे उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत मंजूर झालेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित शाळा, महाविद्यालयांना क्रीडा साहित्याचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्या अंतर्गत विविध संस्थांना कुस्तीसाठीच्या मॅटचे वितरण करण्यात आले. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

तातडीचे काम असेल तरच झेडपीत या!, कोरोना रोखण्यासाठी नियमावली जाहीर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strips ..! Practice wrestling on the mat!