तारळे विभागात 'लालपरी'ची प्रतीक्षाच; विद्यार्थी, नोकरदारांची गैरसोय

तारळे विभागात 'लालपरी'ची प्रतीक्षाच; विद्यार्थी, नोकरदारांची गैरसोय
Updated on

तारळे (ता. सातारा) : मिशन बिगेनअंतर्गत शाळांपासून आता बहुतांश व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, ग्रामीण विभागातील दळणवळणाचे प्रमुख साधन असलेली "लालपरी' अजूनही पूर्वपदावर न आल्याने कष्टकरी, नोकरदार, विद्यार्थी आदी प्रवाशांची गैरसोय होत असून एसटीचे अधिकारी त्याकडे डोळेझाक करत आहेत. तारळे विभागातील पूर्वीच्या फेऱ्या अजूनही पूर्ववत न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक झालेल्या सर्वच गोष्टी आता अनलॉक झाल्या आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर आदींचा वापर करून बाजारपेठा सुरू झाल्या, त्याच धर्तीवर विविध गावांचे ठप्प झालेले आठवडा बाजारही सुरू झाले आहेत. मात्र, दळणवळण ही सध्या समस्या होऊन बसली आहे. त्याचा आठवडा बाजारावर परिणाम होत असून लोकांना इच्छा असून वाहनांअभावी बाजारासह अन्य कामांसाठी बाहेर पडता येत नाही. सध्या जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू झाल्या. मात्र, तारळे विभाग त्यास अपवाद आहे. तारळे-पाटण फेऱ्या नियमित झाल्या आहेत. सातारा मार्गावर केवळ एकच मुक्कामी फेरी आहे. उंब्रज शटलच्या तीन फेऱ्या होत आहेत. 

कऱ्हाड, नागठाणे या आवश्‍यक ठिकाणी एकही फेरी नाही. तारळे-सातारा मार्गावर दिवसा फेऱ्या होणे गरजेचे आहे. शिवाय भागातील पूर्वीच्या मुक्कामी फेऱ्या पूर्ववत करावी, अशी मागणी आहे. अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे आठवडा बाजारात येणे, शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, कामधंदा व नोकरीनिमित्ताने, विविध शासकीय कामांसाठी बाहेर पडणाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. तारळे विभाग हा डोंगरदऱ्यात विखुरला आहे. सध्या वडापदेखील बंद असल्याने लोकांची दळणवळण ही प्रमुख समस्या बनली आहे. उत्पन्नाचे कारण देत एसटीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून विभागातील मुरुड, जुगाईवाडी, पाबळवाडी, जळव, दुसाळे, कडवे, कळंबे आदी फेऱ्या पूर्ववत कराव्यात, अशा मागणीने जोर धरला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com