esakal | Satara: अडीच महिन्यांपासून विद्यार्थी घरातच अडकले
sakal

बोलून बातमी शोधा

अडीच महिन्यांपासून विद्यार्थी घरातच अडकले

मेंढ येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारे त्या परिसरातील अनेक विद्यार्थी शाळा सुरू होऊन अडीच महिने उलटूनही घरीच अडकून पडलेले आहेत.

अडीच महिन्यांपासून विद्यार्थी घरातच अडकले

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा): मध्यंतरीच्या अतिवृष्टीत रस्ता ठिकठिकाणी उद्‌ध्वस्त झाल्याने निवी, कसणी, निगडे, घोटीलसह अनेक दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांकडील एसटीची वाहतूक बंद असल्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. मेंढ येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारे त्या परिसरातील अनेक विद्यार्थी शाळा सुरू होऊन अडीच महिने उलटूनही घरीच अडकून पडलेले आहेत. तातडीने या मार्गाची दुरुस्ती करून बससेवा पूर्ववत करण्याची मागणी संबंधित गावच्या ग्रामपंचायती व विद्यालयाने एसटी महामंडळाकडे निवेदनाव्दारे केली आहे.

हेही वाचा: साताऱ्यासह कऱ्हाडात धुवांधार; ढेबेवाडी खोऱ्यातील महिंद धरण 'ओव्हरफ्लो'

शासनाच्या सूचनेनुसार आणि पालकांच्या संमतीने विद्यालयाने आवश्यक दक्षता घेत आठवी ते दहावीच्या शैक्षणिक कामकाजाला सुरुवात केलेली असली तरी एसटी सेवा बंद असल्यामुळे निवी, कसणी, निगडे, घोटील व त्या लगतच्या अनेक वाड्यावस्त्यांतील विद्यार्थी घरातच अडकून पडलेले आहेत. मेंढ व लगतच्या काही वाड्यांतील थोडेफार विद्यार्थीच सध्या पायपीट करत शाळेत पोचत आहेत. त्यांच्यासाठी पाऊलवाटेची साफसफाई श्रमदानातून करण्यात आलेली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी शिक्षक ऑनलाइन धडे देत असले तरी त्यातही मोबाईलची उपलब्धता व रेंजचाही प्रश्न बिकट आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक आठवड्याला स्वतः विद्यार्थ्यांच्या भेटीला जात आहेत.

हेही वाचा: कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील विंगमध्ये तब्बल पंधरा वर्षांनंतर धावली 'लालपरी'

‘‘शाळेचे कामकाज सुरू झाले असले तरी एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांना दहा-बारा किलोमीटरची पायपीट करून ये-जा करणे शक्य नाही. तातडीने रस्ता सुरक्षित व वाहतूकयोग्य करून एसटीची वाहतूक सुरू करायला पाहिजे.’’

- मारुती ऊर्फ बाळू पाटील, ग्रामस्थ, निवी

loading image
go to top