माणमधील पाणीसाठ्यात वेगाने घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

summers increase water scarcity Rapid decline in water for maan satara

माणमधील पाणीसाठ्यात वेगाने घट

दहिवडी : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टंचाईच्या झळाही वाढू लागल्या आहेत. वाढलेल्या तापमानामुळे माणमधील पाणीसाठ्यात वेगाने घट होऊ लागली आहे. त्यामुळे बहुतांश तलावांची वाटचाल तळ गाठण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. मागील काही वर्षांपासून तालुक्यातील गावोगावी झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडवले जात आहे. मागील दोन वर्षांत पाऊस चांगला झाल्याने तालुक्यात मुबलक पाणीसाठा झाला होता. त्यातच यावर्षी तालुक्याला अधूनमधून अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे.

त्याचा सकारात्मक परिणाम होऊन जमिनीतील पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडविल्याने मोठे जलसाठे पूर्ण क्षमतेने भरण्यास वेळ लागला. कित्येक ओढे-नाल्यांची पाण्याची धार बराच काळ वाहत होती. एकूणच चांगल्या पावसामुळे पाणीसाठा वाढला आहे. वेळी-अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानही सोसावे लागले आहे. तालुक्यातील एकूण दहा मध्यम व लघु प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ३५.०७ दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा २९.८७ दशलक्ष घनमीटर आहे. यावर्षीच्या बदलत्या वातावरणामुळे विविध तलावांतील पाणीसाठा गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेने कमी प्रमाणात घटल्याचे चित्र मार्च अखेरपर्यंत होते.

मात्र, सध्या पाणीसाठ्यात वेगाने घट होत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील सर्व तलावांतील पाणासाठा अर्ध्यापेक्षा कमी असल्याचे दिसते. मासाळवाडी, लोधवडे तलावात ठणठणाट असून, आंधळीसह महाबळेश्वरवाडी व गंगोती तलावांतील पाणीसाठा कमी झाला आहे. सद्य:स्थितीत ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळा सुसह्य करण्यासाठी उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे. अन्यथा पुन्हा एकदा टँकरसाठी हेलपाटे मारावे लागतील.

सध्याचा पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये)

प्रकल्पाचे नाव प्रकल्पीय पाणीसाठा १५ एप्रिलचा उपयुक्त पाणीसाठा

आंधळी ७.४३ १.७९

पिंगळी २.३६ ०.७६

ढाकणी २.६६ १.२२

लोधवडे ०.७० ०.००

गंगोती १.३६ ०.०९

जांभुळणी २.२६ १.००

मासाळवाडी २.०२ ०.००

महाबळेश्वरवाडी १.५० ०.१२

जाशी ३.१६ १.९४

Web Title: Summers Increase Water Scarcity Rapid Decline In Water For Maan Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..