esakal | घरातील सर्व बाधित, मुलगीसह पत्नीलाही कोरोना; मैत्रीच्या 'Oxygen'ने वाचवले प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Shewale

घरातील सर्व बाधित, मुलगीसह पत्नीलाही कोरोना; मैत्रीच्या 'Oxygen'ने वाचवले प्राण

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

सातारा : कोरोनाबाधित झाल्यानंतर कृष्णा रुग्णालयात तब्बल 20 दिवस आयसीयूमध्ये होतो. त्यातही चार दिवस व्हेंटिलेटरवर, तर 16 दिवस ऑक्‍सिजनवर (Oxygen) काढले. घरातील सर्व कोरोनाबाधित (Coronavirus) होते. मुलगी साक्षीसह पत्नी संध्या यांनाही कोरोना होता. त्या दोघीही रुग्णालयात होत्या. मला बरे होण्यास वेळ लागला, तरीही व्हेंटिलेटरवर असल्याची कल्पना असतानाही विचलित न होता धैर्याने व आत्मविश्वासाने त्यावर मात केली. त्या वेळी मित्रांची साथ ऑक्‍सिजनच ठरली. मित्र परिवार आमच्यासाठी धावला. सकारात्मक विचार दिल्याने कोरोनावर विजय मिळवता आल्याचे सुरेश ऊर्फ संभाजी शेवाळे सांगतात. (Suresh Shewale Of Karad Won The Battle Against Coronavirus Satara News)

कऱ्हाड तालुक्‍यातील आटके माझे मूळ गाव. शेतकरी कुटुंबात जन्म झाला. व्यवसाय कऱ्हाडला आहे. कोरोनाचे संकट जगावर आले आहे, तसेच माझ्याही कुटुंबावरही आले. त्याचा मुकाबलाही आम्ही एकत्रित केला. मुलगीला त्रास झाला. त्यानंतर मी व नंतर पत्नी बाधित झालो. काही कळायच्या आत तीन दिवसांत आख्खं कुटुंब रुग्णालयात दाखल झाले. कोरोनाने गाठल्याने स्थिती बिकट होती. मात्र, धीर सोडला नाही. काय करावे, याचे भान नव्हते. मात्र, मित्र परिवार मदतीलाच धावून आल्याने आत्मविश्वास वाढला. त्यामुळे मित्रांनी 20 दिवसांत केलेली मदत लाखमोलाची ठरली. 20 दिवसांतील 16 दिवस ऑक्‍सिजनवर, तर 4 दिवस व्हेंटिलेटरवर होतो. अर्धमेल्या स्थितीत असतानाही जराही घाबरलो नाही, हेही दिवस जातील, असा आत्मविश्वास मनात होता.

राज्यावर कोरोना संकट! महिन्याचे वेतन देऊन 'त्यांनी' जपली सामाजिक बांधिलकी

पहिल्या दिवशी ताप आला, त्यामुळे टेस्ट केली. त्या वेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन्‌ मन निगेटिव्ह झाले, तरीही खंबीरपणे कोरोनाशी मुकाबला केला. रुग्णालयात दुसऱ्या दिवसापासून ऑक्‍सिजन कमी होऊ लागला. एचआरसीटीचा स्कोअर वाढला. त्यामुळे ऑक्‍सिजन लावला. पहिल्या दिवशी पाण्यातील ऑक्‍सिजन, नंतर फुग्यातील ऑक्‍सिजन लावला, त्यानंतर मशिनचा ऑक्‍सिजन लावूनही शरीरातील ऑक्‍सिजन वाढत नव्हता. अखेर व्हेंटिलेटर लावण्यात आले. चार दिवस व्हेंटिलेटरवर काढल्यावर ऑक्‍सिजन लेव्हल वाढली. त्याचदरम्यान इंजेक्‍शन, प्लाझ्मा देण्यात आला.

आख्ख कुटुंब पॉझिटिव्ह असतानाही कोणीही डगमगले नाही. आहार, औषधे, प्लाझ्मासाठी मित्रांचा सपोर्ट मोठा झाला. आहारातही सकसपणा त्यांनीच आणला. सकारात्मक मानसिकता त्यांनी वाढवली. 15 ते 20 मित्र रुग्णालयाबाहेर आमच्यासाठी धावत होते. मित्रांनी खूप धावपळ केली. 25 दिवसांच्या कालावधीत जेवणाचे डबे, बिस्किटे, फळे आदी सगळी जबाबदारी मित्रांनी सांभाळली होती. इंजेक्‍शन, प्लाझ्मासाठीही मित्रांनी जंग-जंग पछाडले. त्यामुळे मैत्रीचा ऑक्‍सिजन कामी आला, हे खरे असले तरी सकारात्मकता, खंबरीपणाही तितकाच महत्त्वाचा आहे.

Suresh Shewale Of Karad Won The Battle Against Coronavirus Satara News