Video : मोर्चा निघणार तेवढ्यात राजू शेट्टींना पोलिसांनी अडविले, मग काय घडले वाचा

उमेश बांबरे
Tuesday, 25 August 2020

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे व लिटरला 25 रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साताऱ्यात संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढला.

सातारा : जोरदार घोषणाबाजी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशांच्या निनादात साेमवारी (ता.24) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बैलगाडी आणण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने राजू शेट्टी व पोलिस अधिकाऱ्यांत वाद झाला. पोलिसांनी दंडुकशाहीची भाषा खुशाल करावी, आम्ही पण आमच्या ताकदीने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिला. 
 
बॉम्बे रेस्टाॅरंट चौकात संघटनेचे कार्यकर्ते जमले होते. मोर्चात बैलगाडी व एक गाय शेतकऱ्यांनी आणली होती. ही बैलगाडी व गाय मोर्चात सहभागी करण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यावरून राजू शेट्टी संतप्त झाले. पोलिस अधिकारी व शेट्टी यांच्यात वाद झाला. सातारा शहरचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना शेट्टींनी जाब विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त झालेले राजू शेट्टी म्हणाले, ""एक गाय मोर्चात आणली म्हणून तुम्ही बैलगाडीला मनाई करता. सातारा जिल्ह्यात एकही बैलगाडी मोर्चात येणार नाही, असे लिहून द्या. आम्ही कायदा-सुव्यवस्थेचा भंग केलेला नाही. आम्ही कोणालाही धक्‍का न लावता शांततेच्या माध्यमातून मोर्चा काढत आहोत. तरी तुम्ही आम्हाला का आडवत आहात.'' श्री. मांजरे यांनी त्यांना कायद्याची भाषा सांगण्यास सुरवात केली. त्यामुळे शेट्टी व संघटनेचे पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले. त्यांनी तुम्हाला काय कारवाई करायची ती करा. आम्ही आमच्या पध्दतीने आंदोलन करणार, अशी भूमिका शेट्टींनी घेतल्यानंतर श्री. मांजरे नरमले.

भारीच की! सातारा जिल्ह्यात 60 कंपन्यांनी उभारले कोरोना केअर सेंटर

दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; शेतकरी रस्त्यावर
 
त्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शेवटी गाय व बैलगाडीसह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. बैलगाडीत बसल्यावर राजू शेट्टींनी दूध दराच्या आंदोलनाबाबतची भूमिका मांडली. त्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात व घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कायकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, स्वाभिमानीचे अध्यक्ष देवानंद पाटील, दादासाहेब यादव, राज्य प्रवक्ते अनिल पवार, धनंजय महामुलकर, रमेश पिसाळ, बापूराव साळुंखे, नितीन यादव, प्रमोद जगदाळे, दत्ता घाडगे, संजय जाधव, महादेव डोंगरे, मनोहर येवले, ऍड. विजय चव्हाण आदींसह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

राज्याच्या क्रीडा विभागातील उपसंचालकासह जिल्हा, तालुका क्रीडाधिकाऱ्यांची बदली