esakal | चिंतेचं गोठोडं घेऊन जितकरवाडीकर घरांकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

चिंतेचं गोठोडं घेऊन जितकरवाडीकर घरांकडे

sakal_logo
By
प्रा.राजेश पाटील

ढेबेवाडी : अतिवृष्टीत (rain) भूस्खलन होऊन डोंगर घसरल्याने तब्बल ३६ दिवसांपासून जिंती (ता. पाटण) येथील माध्यमिक विद्यालयात आश्रय घेतलेल्या जितकरवाडी (Jitkarwadi) येथील दरडग्रस्त कुटुंबांनी आज शाळेतील (school) मुक्काम हलवून पुन्हा आपल्या गावची वाट धरली. ना पुनर्वसित ठिकाणाची निश्चिती, ना पर्यायी निवारा शेड अशा परिस्थितीत भविष्याची चिंता भरलेलं भलं मोठं गाठोडं घेऊन घर गाठलेल्या तेथील कुटुंबांसमोरील समस्यांचा डोंगर शासन कधी आणि कसा हटविणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिंती व निगडे परिसरातील वाड्यावस्त्यांना जुलैमध्ये पावसाचा जबर तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे डोंगर घसरून दरडी कोसळायला लागल्याने तेथील कुटुंबांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवणे गरजेचे होते. मात्र, गावजवळचा वांग नदीवरील पूल महापुरात तुटल्याने आणि मोबाईललाही रेंज मिळत नसल्याने प्रशासनालाही तिथपर्यंत पोचता येत नव्हते. चार दिवस प्रचंड भीतीखाली काढल्यानंतर थोड्याफार उघडिपीचा फायदा उठवत रेस्क्यू ऑपरेशन राबवत प्रशासनाने जितकरवाडी, धनावडेवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडीत अडकून पडलेल्या अनेक कुटुंबांना जिंती व ढेबेवाडी येथे सुरक्षित ठिकाणी हलवले होते. त्यांच्यासाठी गेल्या काही दिवसांत राज्यभरातून मदतीचा ओघ कायम होता. उघडिपीनंतर यापैकी धनावडेवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी येथील कुटुंबे आपापल्या गावी परतली.

हेही वाचा: मुंबईत दरडींचा धोका कायम; मालाडच्या ३५० नागरिकांचे स्थलांतर

मात्र, दरडींचा मोठा धोका असलेली जितकरवाडीतील कुटुंबे सुरक्षेच्या कारणास्तव जिंती येथील देदीप्य विजय कांबळे विद्यालयातच थांबून होती. आज सकाळी त्यांनी तेथून मुक्काम हलवत सोबत असलेल्या प्रापंचिक साहित्यासह पुन्हा आपले गाव गाठले.

डोंगर घसरून घराजवळ आलेला असतानाही जितकरवाडीचे पुन्हा आपल्या गावी परतणे चिंता वाढविणारे आहे. पुनर्वसनाच्या ठिकाणांची निश्चिती नाही, पर्यायी निवारा शेडचाही पत्ता नाही अशा स्थितीत अजून किती दिवस भीतीखाली कंठायचे?असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

loading image
go to top