सातारा : टोल कर्मचाऱ्याचे अपहरण; ट्रॅव्हल्स चालकासह दोघांवर गुन्हा

तानाजी पवार
Tuesday, 13 October 2020

नवीन नियमानुसार ओव्हरलोड असेल तर मालट्रक किंवा लक्‍झरी यांना वजनानुसार टोल द्यावा लागतो. त्यामुळे महामार्गावरील प्रत्येक टोलनाक्‍यावर टोल व्यवस्थापनाने आपला स्वतःचा वजन काटा उभारला आहे.

वहागाव (जि. सातारा) : ओव्हरलोड वाहनाची टोलची रक्कम बुडविण्याच्या हेतूने पुणे-बंगळूर महामार्गावरील तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्‍याच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्यास मारहाण करून त्याला किणी टोलनाक्‍याजवळ ट्रॅव्हल्समधून खाली ढकलून देत ट्रॅव्हल्स चालकाने तेथून पलायन केल्याची घटना रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांची माहिती अशी : रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई ते पणजी प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स (क्रमांक-जी.ए. 07-एफ-8982) ही तासवडे टोलनाक्‍यावर आली. नवीन नियमानुसार ओव्हरलोड असेल तर मालट्रक किंवा लक्‍झरी यांना वजनानुसार टोल द्यावा लागतो. त्यामुळे महामार्गावरील प्रत्येक टोलनाक्‍यावर टोल व्यवस्थापनाने आपला स्वतःचा वजन काटा उभारला आहे. ट्रॅव्हल्स टोलनाक्‍यावर आल्यावर टोलनाक्‍याच्या कर्मचाऱ्यांना ट्रॅव्हल्सच्या टपावरील माल निदर्शनास आला. त्यावेळी त्यांना ओव्हरलोडची शंका आली. त्यामुळे त्या ठिकाणीचे टोल कर्मचारी सूरज कांबळे यांना ट्रॅव्हल्सचे वजन करण्यासाठी वजन काट्यावर ट्रॅव्हल्समधून पाठवले. परंतु, ट्रॅव्हल्सचालकाने ट्रॅव्हल्स वजनकाट्यावर न थांबवता तशीच वेगात कोल्हापूरच्या देशाने नेली.

धाेंड्याच्या महिन्यात बारामतीच्या जावयाला घडली सातारा पाेलिस ठाण्याची वारी

या वेळी सूरज कांबळे यांनी ट्रॅव्हल्स चालकास ट्रॅव्हल्स थांबवण्याची विनंती करत आपल्या मोबाईलवरून टोलनाका ऑफिसमध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या ट्रॅव्हलच्या चालकाने व इतर एकाने सूरज कांबळे यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना मारहाण केली. तसेच गप्प बसण्यास सांगत दमदाटी केली.
 
ओव्हरलोड वाहनाची टोलची रक्कम बुडविण्याच्या हेतूने टोल कर्मचाऱ्याचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकासह दोघांविरोधात तळबीड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोरोना संकटकाळात कष्टाचे झाले चीज, 13 लाख ग्राहकांना महावितरणने दिली वीज!

सूरज विश्वनाथ कांबळे (वय 29, रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) असे अपहरण झालेल्या टोल कर्मचाऱ्याचे नाव आहे. हवालदार एच. डी. मुळीक अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talbid Police Registered Case Incident At Tasawade Toll Plaza Crime News Satara News