
सातारा : उच्च व सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबतच्या निर्बंधांची आठवण पोलिस दलाला आपल्या सोयीने कधी कधीच होत आहे. कास पठारावर वाजविलेल्या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाचा त्रास पोलिसांच्या कानापर्यंत गेला. त्याप्रकरणी गुन्हा दाखल केला हे चांगलेच; परंतु विधानसभा निवडणुकांपासून पोलिस मुख्यालयाच्या ठिकाणी सातारा शहरात दिवसा व रात्रीही झालेल्या दणदणाट, नागरिकांना बसलेल्या कानठळ्या याची कसलीच जाणीव पोलिसांना झालेली नाही. एकाला सूट दिली की दुसरा नाचतोच याप्रमाणे साताऱ्यात ध्वनिक्षेपकाचा धांगडधिंगा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. साताऱ्यातील नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता कायदा सर्वांना समान या न्यायाने पोलिस दलाने वागणे अपेक्षित आहे.