esakal | पुलामुळे वाहतूक होणार सुलभ; कृष्णाकाठच्या लोकांची होणार सोय
sakal

बोलून बातमी शोधा

पुलामुळे वाहतूक होणार सुलभ; कृष्णाकाठच्या लोकांची होणार सोय

जुना पूल दुरुस्त करतच दोन वर्षांत नवीन पुलाची उभारणी पूर्ण होऊन या दोन्ही पुलांवरून दुहेरी वाहतूक होणार आहे.

पुलामुळे वाहतूक होणार सुलभ; कृष्णाकाठच्या लोकांची होणार सोय

sakal_logo
By
- अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (सातारा): येथील कृष्णा नदीवर नवीन पूल उभारण्याची प्रक्रिया शासनाने हाती घेतली आहे. दळणवळणासाठी महत्त्वाचा ठरणारा उंच, अद्ययावत पूल उभा राहणार असल्याने परिसरातील विकासाला बळकटी मिळणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा रखडलेला प्रश्न मार्गी लावला असल्याने कृष्णाकाठच्या लोकांचे सुलभ वाहतुकीसाठीचे ग्रहण सुटणार आहे. जुना पूल दुरुस्त करतच दोन वर्षांत नवीन पुलाची उभारणी पूर्ण होऊन या दोन्ही पुलांवरून दुहेरी वाहतूक होणार आहे.

हेही वाचा: "कृष्णा' ने थकविला रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीचा सव्वाकोटीचा निधी

येथील कृष्णा नदीवर १९८० च्या दशकात पूल उभारण्यात आला. याकामी तत्कालीन मंत्री यशवंतराव मोहिते यांनी प्रयत्न केले होते. (कै.) मोहिते यांनी राज्याच्या सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यानंतर स्थानिक पातळीवर मोहिते यांना श्रेय नको यावरून पुलाचे उद्‍घाटन झाले नाही. पुलावरून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ऊस व इतर अवजड वाहतूक होते. त्याचबरोबर सातारा व सांगली जिल्ह्यांतील वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा सेतू ठरत आहे. २००७ मध्ये नदीच्या महापुरानंतर एका खांबास तडा गेल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. या कालावधीत कारखान्यास नुकसानीस सामोरे जावे लागले.

हेही वाचा: अंतर्गत कलहाने रुतला विकासाचा रथ; रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीत एकमताचा अभाव!

कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी याकामी आमदार चव्हाण यांच्यामार्फत तत्कालीन बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याकडून निधी मिळवत दुरुस्ती झाली. त्यानंतर २०१९ च्या महापुरात पुन्हा खांबांना धोका झाल्याने अवजड वाहतूक बंद ठेवली आहे. सदरच्या पुलाची कार्यक्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे नवीन पुलाची गरज लक्षात घेत आमदार चव्हाण यांनी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी मिळवला. जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. ही दोन्ही कामे सुरू झाली आहेत. येत्या मेअखेरीस जुना पूल दुरुस्त होऊन तो वाहतुकीस खुला होईल, तर नवीन पुलाचे दोन वर्षांत काम पूर्ण होणार आहे.

loading image
go to top