जिल्हा बॅंकेच्या 1963 मतदारांची कच्ची यादी आज प्रसिध्द होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंकेच्या 1963 मतदारांची कच्ची यादी आज प्रसिध्द होणार

बॅंकेच्या १९६३ मतदारांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

जिल्हा बॅंकेच्या 1963 मतदारांची कच्ची यादी आज प्रसिध्द होणार

सातारा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदारांची कच्ची मतदार यादी आज (शुक्रवारी) प्रसिद्ध होत आहे. बॅंकेच्या १९६३ मतदारांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. ही यादी विभागीय सहनिबंधक कार्यालय कोल्हापूर, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्रसिध्द केली जाणार आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी आज प्रसिध्द होत आहे. सकाळी अकरा वाजता ही यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर १३ सप्टेंबरपर्यंत या यादीवर हरकती, आक्षेप दोन प्रतींमध्ये सादर करायची मुदत असेल. या हरकती, आक्षेप सहनिबंधक कार्यालय कोल्हापूर येथे सादर कराव्‍या लागणार आहेत. प्राप्त हरकती व आक्षेपांवर २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय देण्याचा कालावधी असेल. त्यानंतर २७ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल.

ही यादी तीन ठिकाणी प्रसिध्द होईल. त्यानंतर निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम विभागीय सहनिबंधक जाहीर करतील. मतदारांच्या कच्च्या यादीत सोसायटी मतदारसंघातून ९५७, खरेदी-विक्री संघ मतदारसंघाचे ११, कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांतून २७, नागरी बॅंक आणि पतसंस्था मतदारसंघातून ३७४, गृहनिर्माण आणि दूध संस्थांचे २७२, औद्योगिक व मजूर संस्थांतून ३२२ अशी एकूण १९६३ मतदारांची कच्ची मतदार यादी तयार करण्यात आली आहे.