महाबळेश्वरकरांना हवीय पाेलिसांची सुरक्षा

अभिजीत खूरासणे
Thursday, 26 November 2020

बॅंकेतुन काही चोरी झाली नाही ना या बाबत बॅंकेचे कर्मचारी यांनी पत्रकारांना काही माहीती दिली नाही तर, सकाळी चोरीची घटना उघडकीस येवुनही बॅंकेच्या वतीने पोलिस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे या चोरी बाबत अनेक प्रश्न उपस्थित रहात आहेत.

महाबळेश्वर : येथील ऑर्चिड मॉल मधील महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम फोडुन मोठया रक्कमेवर डल्ला मारण्याचा चोरटयांचा प्रयत्न फसला. दरम्यान मध्यवस्तीत घडलेल्या या चोरीच्या घटनेने महाबळेश्वरमध्ये एकच खळबळ माजली आहे. शहराच्या मध्यवस्तीत सुभाष चौक आहे. या चौकाजवळ ऑर्चिड मॉल आहे. या मॉलच्या पहिल्या माळयावर महाराष्ट्र बॅंकेची शाखा आहे. या शाखेच्या प्रवेशव्दारावरच बॅंकेचे एटीएम मशिन बसविण्यात आले आहे. या एटीएमचा मागील भाग हा बॅंकेच्या शाखेत येतो.

बुधवारी (ता.25) सकाळी बॅंकेचे कर्मचारी बॅंकेत कामावर आले तेव्हा बॅंक फोडुन बॅंकेच्या एटीएम मशीन मधुन चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे कर्मचारी यांच्या लक्षात आले. या बाबत बॅंकेचे कर्मचारी यांनी तातडीने बॅंक बंद करून पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तातडीने बॅंकेत येवुन चोरीच्या घटनेचा पंचनामा केला. या बॅंकेच्या दक्षिण बाजुला एक खिडकी आहे. या खिडकीचे गज कापुन चोरटयांनी बॅंकेत प्रवेश केला असावा असा तर्क पोलिसांनी लावला आहे. या ठिकाणी चोरटयांनी खिडकीचे गज कापण्यासाठी वापरलेले ब्लेड पोलिसांनी हस्तगत केले आहे.

असाही प्रामाणिकपणा! महामार्गावर सापडलेली दागिन्यांची बॅग अपशिंगेच्या युवकांनी केली परत     

चोरटयांनी बॅंकेची प्रथम रेकी केली असावी कारण या बॅंकेत जे सीसीटिव्ही कॅमेरे आहेत यामध्ये आपली चोरी पकडली जावु शकते म्हणुन चोरटयांनी आल्या आल्या हे कॅमेरे फिरवुन त्यांची दिशा बदलली. जेणे करून चोरीची घटना कॅमेरामध्ये येणार नाही याची खबरदारी चोरटयांनी घेतल्याचे दिसते असे असले तरी बॅंकेच्या वतीने सीसीटिव्हि तज्ञांना बोलविण्यात आल्याचे बॅंक व्यवस्थापनाने पत्रकारांना सांगितले. एटीएम मशीन मागील बाजुने फोडण्यात आले आहे परंतु नोटा असलेला भाग काही चोरटयांना फोडता आला नाही. त्या मुळे चोरटयांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न येथे फसल्याचे दिसत आहे. एटीएम मधुन काही सापडत नाही हे पाहुन चोरटयांनी बॅंकेतील काही कपाटेही फोडली आहेत. त्या ठिकाणी असलेल्या फायली अस्ताव्यस्त टाकुन काही रक्कम हाती लागते का याचा प्रयत्नही चोरटयांनी केला आहे. 

साताऱ्यात उदयनराजेंचा हटके अंदाज; जिप्सी रायडिंग अन् गाण्यावर अफलातून ठेका..

एखाद्या घरात चोरी झाली तर, तातडीने हाताचे ठसे घेणारे तज्ञ व श्वान पथक मागविले जाते परंतु बॅंकेतुन एटीएम फोडण्याचा प्रकार सकाळी उघडकीस येवुनही येथे बॅंकेने अथवा पोलिसांनी श्वान पथक व हस्तरेषा तज्ञांना पाचारण केले नाही. याबाबत शहारातुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सायंकाळ पर्यंत पोलिसांत रितसर तक्रार दाखल न झाल्याने पोलिस तपासा बाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. मागील आठवडयात दिवाळी हंगामामुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले होते. दोन दिवसांपुर्वीच ही गर्दी ओसरली आहे. अशा वेळी मध्यवस्तीत अशा प्रकारे बॅंक फोडण्याचा प्रयत्न चोरटयांनी केल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले असुन पोलिसांच्या रात्रगस्ती बाबत शहरातील नागरीकांकडुन शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान बॅंकेतुन काही चोरी झाली नाही ना या बाबत बॅंकेचे कर्मचारी यांनी पत्रकारांना काही माहीती दिली नाही तर, सकाळी चोरीची घटना उघडकीस येवुनही बॅंकेच्या वतीने पोलिस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे या चोरी बाबत अनेक प्रश्न उपस्थित रहात आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft In Bank Of Maharashtra ATM Center Mahabaleshwar Satara News