सावधान! विहे घाटात बिबट्याचा मुक्काम; कुत्र्यांच्या शोधार्थ बिबट्या दबा धरून

जालिंदर सत्रे
Friday, 20 November 2020

नावडी, वेताळवाडीसह मारूल हवेली परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, दररोज कोणाला तरी दर्शन घडतं आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

पाटण (जि. सातारा) : विहे घाटात बिबट्याचा वावर वाढला असून, रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धोका निर्माण झाला आहे. बुधवारी रात्री मोटारसायकलवरील प्रवाशाचा बिबट्याने पाठलाग केला. मात्र, प्रवाशांनी प्रसंगावधान राखत आपली सुटका केली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, विहे व उरूल घाटात चिकनचा व्यवसाय करणारे दिवसभरातील कचरा टाकतात. तो खाण्यासाठी कुत्री जमा होतात. त्या कुत्र्यांच्या शोधात बिबटे दबा धरून बसलेले असतात. बुधवारी रात्री कुत्र्याचा पाठलाग बिबट्या करीत होता. त्या वेळी मल्हारपेठ येथील रहिवासी कऱ्हाडहून मल्हारपेठकडे मोटारसायकलवरून येत होते. त्यांना बिबट्याने आपलाच पाठलाग केला, असे वाटले. 

VIDEO : अबब.. दहा फुटी मगर येरळवाडी नदीपात्रात; नागरिकांचा उडाला थरकाप

त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखून मोटारसायकलचा वेग वाढवला व निर्माण झालेल्या प्रसंगातून जीव वाचविला. झाल्या प्रकाराने मल्हारपेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नावडी, वेताळवाडीसह मारूल हवेली परिसरात ही बिबट्याचा वावर वाढला असून, दररोज कोणाला तरी दर्शन घडतं आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is Free Movement Of Leopards In Vihe Ghat Satara News