
सातारा : गोंदवल्यात यंदा राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा
गोंदवले - पंचाहत्तर वर्षांची नाट्य परंपरा असलेल्या परंतु कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झालेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा पडदा यंदा गोंदवले खुर्दमध्ये उघडणार आहे. गोकुळाष्टमीनिमित्त ऑगस्टमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याने गोंदवलेकर व नाट्यप्रेमींमधून आनंद व्यक्त होतोय.स्वातंत्र्यानंतर लगेचच सुरू झालेली नाट्यपरंपरा गोंदवले खुर्दमध्ये (ता. माण) अखंडितपणे सुरू आहे. गेल्या २८ वर्षांपासून गोकुळाष्टमीनिमित्त दरवर्षी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव व नाट्य स्पर्धांचे आयोजन नाट्यप्रेमी, नाट्य स्पर्धा समिती व ग्रामस्थांकडून करण्यात येते. साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांतील नाट्य संस्था या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. उत्कृष्ट नाट्यासह नाट्यसंबंधी विविध विभागात अव्वल सादरीकरणाला बक्षिसे देऊन कलेला दाद दिली जाते.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत ही स्पर्धा खंडित झाली. यंदा मात्र मोठ्या जोमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ता. १२ ते २२ ऑगस्टदरम्यान या नाट्य स्पर्धा होतील. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १५ जून असून त्यानंतर दोन दिवसांत नाट्य सादरीकरणाच्या वेळा समितीकडून निश्चित केल्या जातील. यंदाच्या विजेत्या नाट्य संघांना अनुक्रमे ३१ हजार, २५ हजार, २० हजार व १५ हजार रुपये तसेच फिरती व कायम ट्रॉफी देण्यात येईल. त्याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना व उत्कृष्ट स्त्री- पुरुष अभिनय यांनाही रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व करंडक देऊन प्रोत्साहन देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी नाट्य संस्थेने नाट्य लेखकाची परवानगी, सेन्सार सर्टिफिकेट व सादर करणाऱ्या नाटकाची एक प्रत नाट्य समितीकडे द्यावी लागणार आहे. माहितीसाठी रमेश खांडेकर (मो. ९५६१९०५२९०) यांच्याशी संपर्क साधावा.
दोन वर्षांनंतर पुन्हा नव्या जोमाने नाट्य स्पर्धा होणार असल्याने खूप आनंद होतोय. नाट्य संस्थांनी सहभागी होऊन कलेला दाद देण्याची संधी गोंदवलेकरांना द्यावी.
- अर्जुनराव शेडगे, नाट्य समिती सदस्य, गोंदवले खुर्द.
Web Title: This Year State Level Drama Competition In Gondavale
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..