
यंदाचा 81 वा औंध संगीत महोत्सव रविवारी होणार
औंध : यंदाचा ८१ वा औंध संगीत महोत्सव येत्या रविवारी ऑनलाइन पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती संगीत महोत्सवाच्या संयोजक शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या सहसचिव अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या औंध संगीत महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी दोन सत्रात हा संगीत महोत्सव होणार आहे.
पहिले सत्र सकाळी दहा वाजता, तर दुसरे सत्र सायंकाळी पाच वाजता ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे.
याबाबत गोखले म्हणाल्या, की अजूनही कोरोनाचे संकट न संपल्याने हा संगीत महोत्सव येत्या रविवारी ऑनलाइन पद्धतीने साजरा केला जाणार आहे. हा महोत्सव शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या युट्युब लाइव्ह चॅनेलवर व औंध संगीत महोत्सवाच्या फेसबुक पेजद्वारे रसिक श्रोत्यांना शास्त्रीय संगीताचा आनंद लुटता येणार आहे. ललित कला केंद्र गुरुकुल सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या सहकार्याने हा संगीत महोत्सव ऑनलाइन पद्धतीने दोन सत्रात आयोजित केला जाणार आहे. १९४० पासून सुरू असलेल्या औंध संगीत महोत्सवाचे यंदा ८१ वे वर्ष आहे. रविवारी ऑनलाइन पद्धतीने होणारा संगीत महोत्सव सकाळी दहा वाजता सुरू होणार असून, पहिल्या सत्रात पुणे येथील ललित कला केंद्राचे मयूर महाजन यांचे गायन सादर केले जाणार आहे. त्यांना संवादिनी साथ अभिनय रवंदे करणार आहेत. तबला साथ सौरभ क्षीरसागर करणार आहेत. त्यानंतर संवादिनी वादक व रचनाकार डॉ. चैतन्य कुंटे यांच्या संवादिनी वादनाचा कार्यक्रम होणार आहे. पहिल्या सत्राची सांगता शास्त्रीय गायिका श्रीमती मंजिरी आलेगावकर यांच्या गायनाने होणार आहे.
हेही वाचा: केंद्राकडून दिवाळी गिफ्ट; पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त
द्वितीय सत्राची सुरुवात सायंकाळी पाच वाजता युवा व्हायोलिन वादक मानसकुमार यांच्या व्हायोलिन वादनाने होणार आहे. त्यानंतर युवा गायक आदित्य मोडक यांचे गायन होणार आहे. सुप्रसिद्ध तबला वादक विश्वनाथ शिरोडकर यांचे एकल तबला वादन होणार आहे. दुसऱ्या सत्राची सांगता सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती देवकी पंडित यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
Web Title: This Years 81st Aundh Music Festival Held Sunday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..