
या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर चालक पसार झाला आहे. संबंधित वाहन लोणंदच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
खंडाळा/ लोणंद : आई... ग... तू लवकर उठ, मला सोडून नको जाऊ... असा हंबरडा उत्कर्ष व शौर्या या लहानग्यांनी फोडल्यानंतर अख्खी शेळकेवस्ती (लोणंद) दुःखाच्या सागरात बुडाली. सैनिक म्हणून देशसेवा बजावून आलेल्या भगवान धायगुडे यांच्यावर तर आई, वडील व पत्नी अचानक गेल्याने दुःखाला सीमाच राहिली नाही. बाप व मुलांचे दुःख पाहून अनेकांचे डोळे पाणावले. नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
लोणंद- खंडाळा रस्त्यावर शेळके वस्तीजवळ घाडगे मळ्यानजीक गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये धायगुडे दांपत्यासह त्यांच्या सुनेचा समावेश आहे. त्यातील दोघे जागीच ठार झाले, तर उपचारासाठी पुण्याला नेताना सुनेचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनासह चालक बेपत्ता झाला आहे. घटनास्थळी अपघातग्रस्त वाहनाची नंबर प्लेट मिळाली असून, त्यावरून पोलिस वाहनाचा शोध घेत आहेत.
बबन धायगुडे हे मूळ खेड बुद्रुक (ता. खंडाळा) येथील रहिवाशी होते. ते जवळ शेळके वस्तीवर राहून शेती पाहत होते. "महावितरण'मध्ये वायरमन म्हणून सेवा करून ते सेवानिवृत्त झाले होते. सारिका यांचे पती भगवान हे दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन घरी आले होते. सारिका यांना उत्कर्ष (वय 13) व शौर्या (वय 11) अशी दोन मुले आहेत. बबन धायगुडे यांना दोन मुली आहेत. ही दुःखद घटना समजताच निंबोडी (ता. खंडाळा) व विटा (जि. सांगली) येथून आलेल्या बबन धायगुडे यांच्या मुलींनी शेळके वस्तीवर आई-वडिलांचे मृतदेह पाहून आक्रोश केला. या दोघी आल्यानंतर नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या तिघांवरही दुपारी चार वाजता विरोबा वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी मोठा समुदाय उपस्थित होता. या घटनेमुळे शेळकेवस्ती व खेड बुद्रुकसह लोणंद परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणंद- खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळील घाडगे मळ्यानजीक पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बबन धायगुडे, शांताबाई धायगुडे व सारिका धायगुडे हे तिघे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. घरापासून काही मीटर अंतर खंडाळा बाजूकडे चालत गेल्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास अचानकपणे पांढऱ्या रंगाच्या वाहनाने समोरून येत या तिघांनाही जोरदार धडक दिली. या अपघातात बबन धायगुडे व शांताबाई धायगुडे हे जागीच ठार झाले, तर त्यांची सून सारिका या गंभीर जखमी झाल्या. पुणे येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर चालक पसार झाला आहे. संबंधित वाहन लोणंदच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेले. अपघातस्थळी या वाहनाचा बंपर व नंबर प्लेट सापडली आहे. त्यावरून वाहनाचा शोध घेत आहाेत. यावेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांचे सहकारी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
मराठा आरक्षणाचा अंतिम लढा छत्रपतीं च्या नेतृत्वाखाली व्हावा; शिवेंद्रसिंहराजेंची भावना
आई-वडिलांसह पत्नीला अग्नी देण्याची वेळ
दोन वर्षांपूर्वी सैन्यातून सेवानिवृत्त झालेले मेजर भगवान धायगुडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे आई- वडील व पत्नी हे तिघे जण सकाळी फिरायला गेले होते. अपघातात एकच वेळी तिघांचाही मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्यासह त्यांची मुलगी शौर्या (वय 13) व उत्कर्ष (वय 11) यांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.
Edited By : Siddharth Latkar