
कऱ्हाडला रोज टनभर प्लॅस्टिक कचरा
कऱ्हाड - शहरातील प्लॅस्टिकचा कचरा पालिकेची डोकेदुखी ठरू लागला आहे. रोजच्या कचऱ्यासोबत किमान टनभर प्लॅस्टिकचा कचरा येत आहे. त्यामुळे त्याची विल्हेवाट कशी लावयाची ? याचा प्रश्न आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे त्याची विल्हेवाट लावली जात आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्यालाही ब्रेक लागल्याची स्थिती झाल्याने प्लॅस्टिक कचरा गंभीर बनताना दिसत आहे. प्लॅस्टिकचा कचरा कंपन्या पुनर्वापरासाठी नेत आहेत. मात्र, प्रक्रिया करूनही राहणाऱ्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे करायचे काय, याचे पालिकेला कोडे पडले आहे.
शहराची व्याप्ती वाढते आहे. त्या प्रमाणात येथे कचऱ्याची समस्याही डोके वर काढते आहे. आरोग्य विभागाने चांगल्या पद्धतीने त्यांचे काम सुरू ठेवले आहे. शहर कचरा कोंडाळेमुक्त केले. शहरातील प्रत्येक भागात घंटागाडी जाते आहे. ती सुविधा अधिक सुलभ व्हावी, यासाठी पालिकेने नुकत्याच १८ घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. ओला, सुका कचऱ्याचे नियोजन केले. बारा डबरी परिसरात ओला कचऱ्याचा प्रकल्पही उभा आहे.
शहरातील घंटागाड्यांसह अन्य ठिकाणचा कचरा असा दररोज सुमारे ३२ टन कचरा येथे जमा होतो. पाच ते सात वर्षांपूर्वी त्याचे प्रमाण कमी होते. अलीकडच्या काळातच तो वाढला. त्यात ओला व सुका कचरा वेगळा केला गेल्याने कचऱ्यासोबत प्लॅस्टिकचा कचरा वाढतो आहे. साधारण तो दररोज किमान टनभर आहे. त्यामुळे त्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न पालिकेसमोर आहे. सध्यातरी काही कंपन्या तो कचरा नेत होते.
मात्र, त्याच्या पुनर्वापरावरही कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. काही लोकांना ते काम दिले असले, तरी त्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकच्या राहणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. मध्यंतरी १४ टन कचरा खड्डा काढून जेसीबीच्या मदतीने पुरण्यात आला. तो प्लॅस्टिकचाच कचरा आहे. आता पुन्हा दररोजचा टनभर कचऱ्याने गंभीर स्थिती आहे. कचरा वाढत राहिल्यास त्याच्या विल्हेवाटीचे नियोजन पालिकेला स्वतंत्रपणे करावे लागेल.
मध्यंतरी पालिकेने शहरातील विविध लोकवस्तीत स्वच्छता मोहीम घेतली. त्यात सुमारे प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात गोळा झाला. त्यामुळे शहरात वाढत्या प्लॅस्टिकचा कचरा धोकादायक ठरत असल्याचा अहवाल आहे. थर्माकॉल, प्लॅस्टिकचे कागद, पाण्याच्या बाटल्या, थंड पेयाच्या बाटल्या, लहान टीन याचाच समावेश आहे. त्याचा पुनर्वापर होऊ शकतो, असे गृहित धरले तरी उर्वरित प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न आहे.
शहरातील प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो. पालिका त्याची विल्हेवाट लावत आहे. त्याचे विलगीकरण करून तो कचरा पुनर्वापरासाठी दिला जातो. त्यानंतरही राहणारा कचरा टाकाऊपासून टिकाऊसाठी वापरण्याचा पालिका प्रयत्न करत आहे.
- रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड.
...येथून येतेय प्लॅस्टिक
स्मशानभूमी परिसर
मुख्य बाजारपेठेतील कचरा
कृष्णा घाट व बाग परिसर
कृष्णा पूल परिसर
नवीन कोयना पूल
कोयनेश्वर मंदिर परिसर
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसर
वाखाण भागासह लगतच्या कॉलन्या
रुक्मिणी इस्टेटसह अन्य उपनगरे.