
विकएंडला पाचगणीत पर्यटक चिंब
पाचगणी - दोन वर्ष दाटलेल्या कोरोनाच्या ढगांचे सावट यावर्षी हटल्याने मोकळा श्वास घेण्याची मोकळीक मिळाल्याने विकएंडला निसर्गाच्या सोहळ्यात चिंब होण्यासाठी पर्यटक येथे दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे वर्षाऋतूचा हंगाम बहरू लागला आहे.
वरुणराजाने कधी हलक्या, तर कधी जोरदार हजेरी लावली आहे. त्याला धुके व थंडीची जोड मिळाल्याने येथील निसर्ग अधिक खुलला आहे. बदलत्या निसर्गाच्या रुपदर्शन घेण्यासाठी पर्यटक येथे विकएंडचे औचित्य साधून हजेरी लावत आहेत. सततच्या पावसामुळे हिरवळीच्या लेण्याने डोंगर सजले आहेत. सारा परिसर पर्यटकांना मोहित करत आहे. कधी ऊन... कधी पाऊस... कधी धुक्याचे साम्राज्य... निसर्गाच्या विविध छटांची मुक्तहस्ते उधळण या परिसरात होऊ लागली आहे.
मुसळधार बरसणाऱ्या जलधारा, धुक्याच्या साम्राज्यात व गुलाबी थंडीचा मनसोक्त आनंद घेताना पर्यटक टेबल लँड, पारसी पॉइंट येथे धुक्याच्या साम्राज्यात रममाण होत आहेत. बदलत्या निसर्गाच्या जादुई किमया न्याहळन्याचा मनसोक्त आनंद घेण्यात तल्लीन होताना दिसत आहेत. दूरवर पसरलेल्या डोंगररांगा, कड्या कपरीतून पिंजलेल्या कापसाप्रमाणे अवतीर्ण होणारे ढगांचे थवे, डोंगररांगातून गुंफलेल्या वेणी प्रमाणे उतरणारे पाणी, दूरवर असलेल्या भिलार वॉटरफॉलचे फेसाळलेले तुषाराचा हौशी पर्यटक आनंद घेत आहेत. पुस्तकाचे गाव भिलार हे सुद्धा पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण झाले आहे.
उन्हाळी हंगामातील थंड हवेच्या या ठिकाणची खासियत असलेल्या स्ट्रॉबेरीची, मलबेरी रस्पबेरीची जागा आता मक्याच्या कणसांनी व गरमागरम भुईमुगाच्या शेंगांनी घेतली आहे. पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी धुक्याच्या साम्राज्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
Web Title: Tourist Arrive On Weekend In Pachgani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..