
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी फुटणार
कऱ्हाड : जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था होणार आहे. त्यासाठी तब्बल ९८ कोटी ७१ लाखांची तरतूद आहे. कऱ्हाड तालुक्यातील इंदोली, शिवडे फाट्यावर भुयारी मार्ग होणार आहे. सातारा तालुक्यातील काशीळ येथे सेवारस्त्याची रुंदी वाढवली जाणार आहे. त्या पर्यायी व्यवस्थेमुळे स्थानिक वाहनांना प्रवास करता येईल. त्यामुळे तेथे होणारे अपघातही टाळता येणार आहेत. वाहतूक कोंडीही कमी होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदीकरणाच्या कामाच्या निविदा नुकत्याच खुल्या झाल्या आहेत. त्यात विविध कामांचा समावेश आहे. त्या कामाला किमान तीन महिन्यांनंतर सुरुवात होणार आहे. त्याच महामार्गावरील तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघातासह वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुविधा दिल्या आहेत. त्यासाठी ९८ कोटी ७० लाखांची तरतूदही केली आहे. जिल्ह्यातील इंदोली, मसूर फाट्यासह काशीळला त्या सुविधा होणार आहेत. इंदोली, मसूर फाट्यावर वाहन भुयारी मार्ग होणार आहे. काशीळला सेवारस्त्याची रुंदी वाढवली जाणार आहे. इंदोली फाट्यावर होणाऱ्या वाहन भुयारी मार्गाची लांबी एक ते सव्वा किलोमीटर असणार आहे. २० बाय साडेपाच मीटरचा हा मार्ग आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. दोन्ही बाजूने सेवारस्ताही विकसित केला जाणार आहे. भुयारी मार्ग सेवारस्त्यासह पुन्हा महामार्गाला जोडला जाणार आहे.
भुयारी मार्ग सिमेंट पाइपच्या सहा मोऱ्या आहेत. मसूरच्या वाहन भुयारी मार्गाची लांबी दीड किलोमीटरची आहे. वीस बाय साडेपाच मीटरचा हा मार्ग आहे. दोन्ही बाजूने सेवारस्ताही दीड किलोमीटरपर्यंत विकसित केला जाणार आहे. त्या सेवारस्त्यावर दोन लहान पूलही आहेत. वाहन भुयारी मार्गातून येणारा सेवारस्त्यासह पुन्हा महामार्गाला जोडला जाणार आहे. काशीळला किमान दीड किलोमीटरचा सेवारस्ता विकसित केला जाणार आहे. त्यासाठी सेवारस्ता सुमारे तीन किलोमीटरचा आहे. तो किमान दोन्ही बाजूने चार किलोमीटरपर्यंत वाढविला जाणार आहे.
...अशी आहे तरतूद
इंदोली फाट्यावरील वाहन भुयारी मार्गासाठी ४५ कोटी ३५ लाख १४ हजारांची तरतूद
मसूर फाट्यावर वाहन भुयारी मार्गासाठी ४७ कोटी १७ लाख ७९ हजारांची तरतूद
काशीळ येथे सेवारस्त्यासाठी सहा कोटी १८ लाख ७५ हजारांच्या निधीची तरतूद
Web Title: Traffic Jam On Pune Bangalore National Highway Alternative Arrangement Provision Of 98 Crore 71 Lakhs Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..