
Satara News : पूरस्थिती हाताळण्याचे एनडीआरएफकडून प्रशिक्षण
कऱ्हाड : संभाव्य महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पथकाने आज जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने येथील कृष्णा नदीमध्ये प्रात्यक्षिक सादर करून जनजागृती केली. महापुराच्या संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवासी नायब तहसीलदार युवराज पाटील यांनी सांगितले.
कऱ्हाड व परिसराला २०१९ मध्ये महापुराचा मोठा फटका बसला होता. या वेळी कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणीपातळीत अचानकपणे वाढ झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या आपत्तीमध्ये प्रशासनाने कोणतीही जीवितहानी न होता आपत्तीग्रस्तांना मदत केली होती.
या महापुराचा अनुभव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख देविदास ताम्हाणे यांनी आपत्तीपूर्वीच आपत्ती आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन संभाव्य आपत्ती येणाऱ्या ठिकाणी सुरू केले आहे.
त्याअंतर्गत आज येथील प्रीतिसंगम घाटावर राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पथकाने आपत्ती निवारणासंदर्भातील प्रात्यक्षिके सादर केली. आपत्ती काळात मदतीसाठी पाण्यात जाऊन लोकांचा बचाव कसा करावा, पुरात बुडणाऱ्यांना पोहून कसे बाहेर काढावे, बोट कशी चालवावी आदींचे प्रशिक्षण आज देण्यात आले.
या वेळी निवासी नायब तहसीलदार युवराज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कुंभार, मंडल अधिकारी महेश पाटील, जे. बी. बोडके, डी. सी. दीक्षित, आर. आर. ढाणे, युवराज काटे, एन. जे. मर्ढेकर,
श्रीमती एस. एस. थोरात, पोलिस उपनिरीक्षक आर. पी. पुजारी यांच्यासह पालिकेचा अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, तलाठी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दिले प्रशिक्षण
आपत्ती आल्यावर विद्यार्थ्यांनी कोणती दक्षता घ्यावी, याची माहिती आपत्ती दलाच्या जवानांनी दि. का. पालकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही दिली. या वेळी त्यांनी बोटीतून विद्यार्थ्यांना नदीपात्रात फिरवून थेट प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही तो अनुभव आला.