सातारा : पर्यटकांच्या गर्दीने टाेल नाक्यांवर 'दिवाळी'

प्रशांत गुजर/तानाजी पवार
Sunday, 15 November 2020

दिवाळीच्या निमित्ताने शहरात कामाला असणारे चाकरमानी सणासाठी गावी परतु लागल्याने पुण्याहून साताराला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

सातारा : दिवाळी सुटी निमित्त पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुण्यातील नागरिक महाबळेश्वर, पाचगणी, काेल्हापूर, काेकणासह गाेव्याला जातानाचे चित्र पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दिसत आहे. यामुळेच तब्बल आठ महिन्यांनंतर आनेवाड़ी आणि तासवडे या दाेन्ही टोल नाक्यांवर आज (रविवार) सकाळपासून वाहनधारकांची वर्दळ दिसत हाेती. दरम्यान काेराेनाच्या पार्श्वभुमीवर या दाेन्ही टाेल नाक्यांवर आवश्यक त्या उपयायाेजना केल्या गेल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

सायगाव : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या आनेवाड़ी टोल नाक्यावर दिवाळीच्या तोंडावर शुक्रवार पासूनच मोठ्या प्रमाणात वाहतुक जाम हाेत हाेती. मात्र टोल व्यवस्थापनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चोख काळजी घेण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळत हाेता. नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या येथील टोल नाक्यावर गेल्या आठ महिन्यांपासुन कोरोनामुळे वाहतूकीचे प्रमाण कमी होत हाेते. दिवाळीच्या निमित्ताने शहरात कामाला असणारे चाकरमानी सणासाठी गावी परतु लागल्याने पुण्याहून साताराला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टाेल व्यवस्थापनाकड़ून येथे प्रवाशांची व्यवस्थित काळजी घेतली जात होती. फास्ट टॅगमुळे देखील जास्त गर्दी न होता वाहने पुढे सरकताना दिसत होती. येथे प्रत्येक बूथवर सॅनिटायझरचा वापर केला जात असल्याने कर्मचारी आणि प्रवासी या
दाेघांची काळजी घेताना आढळले.  

ज्या आजीनं मांडीवर प्राण सोडला, त्याच आजीच्या तिरडीवरुन नाना पाटील पोलिसांना तुरी देत पसार झाले!

कोल्हापूरच्या दिशेने गाड्याच गाड्या
 
वहागाव (जि. सातारा) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आपली रखडलेली कामे करण्यासाठी व नातेवाईकांच्या भेटी गाठीसाठी गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर पडताना दिसत आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्यावर आज (रविवार) सकाळपासून सातारा बाजूकडून कोल्हापूरला जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे.

आठ महिन्यांपूर्वी कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला होता, परिणामी नाईलाजाने सर्वांना घरात थांबावे लागले होते. लाॅकडाऊनमुळे देवदर्शनासह अनेकांची इतर कामेही रखडली होती. दरम्यान राज्य शासनाने आता हळूहळू लाॅकडाऊन शिथील केल्यामुळे पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. 

तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्यावर आज (रविवार) सकाळपासून सातारा बाजूकडून कोल्हापूर बाजूकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली हाेती. परिणामी टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. तसेच सोमवार पासून राज्यातील बंद असलेली मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाला असल्याने सोमवार पासून महामार्गावर आणखी वर्दळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोल नाक्यावरुन वाहनधारकांना सहज व जलदरित्या प्रवास करता यावा यासाठी टोल व्यवस्थापनाने ज्यादा मनुष्यबळासह आवश्यक उपाययोजनांचे नियोजन केले असल्याचे टोल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travellers Increased On Pune Bangalore National Highway Satara News