esakal | लॉकडाउनमुळे ट्रॅव्हल्सची चाके जाग्यावरच; प्रशासनाची पर्यटनावरही बंदी

बोलून बातमी शोधा

Travels
लॉकडाउनमुळे ट्रॅव्हल्सची चाके जाग्यावरच; प्रशासनाची पर्यटनावरही बंदी
sakal_logo
By
विलास माने

मल्हारपेठ (सातारा) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रवासी वाहतुकीच्या ट्रॅव्हल्स मालकांना मोठा फटका बसला आहे. कसाबसा सुरू झालेला व्यवसाय पुन्हा कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे बॅंकांच्या कर्जाचे हप्ते थकल्याने ट्रॅव्हल्स मालकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शासनाने बॅंक कर्जाच्या हप्त्यात सवलत देऊन कर्जाचे व्याज माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोरोनामुळे मागील वर्षापासून ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे. लॉकडाउनमुळे प्रवासी वाहतुकीसह पर्यटनावरही बंदी घातल्यामुळे बहुतांशी ट्रॅव्हल्स मालकांनी आपला गाशा गुंडाळला आहे. दरम्यान, पाटण तालुक्‍यातील मुंबईला प्रथम प्रवासी वाहतूक करणाऱ्या जवळपास 80 बस मागच्या काही महिन्यांपासून जाग्यावर उभ्या आहेत.

सातारकरांनाे! इथं मिळेल तुम्हांला ऑक्‍सिजन बेड

पाटण तालुक्‍यातील ढेबेवाडी, तळमावले, पाटण, कोयना, मल्हारपेठ, नवारस्ता, तारळे, चाफळ या विभागातून मुंबईला प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस ये- जा करतात. त्यावर अनेकांचा चरितार्थ सुरू असतो. मात्र, लॉकडाउनमुळे खासगी प्रवासी बस वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकांचा व्यवसाय बंद झाला आहे. व्यवसायच बंद झाला असल्याने यावर उदरनिर्वाह असणाऱ्या चालक, क्‍लीनरवर उपासमारीची वेळ आली आहे, तर ट्रॅव्हल्स मालकांपुढे कर्जाचे हप्ते भरण्याचे संकट आहे. शासनाने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना कर्जाच्या हप्त्यामध्ये दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Edited By : Balkrishna Madhale