'माझ्या गाडीला हात लावायची हिम्मत नांगरे-पाटलांत पण नाही'

सचिन शिंदे
Monday, 2 November 2020

रविवारी सायंकाळी उंडाळे येथे ट्रॅव्हल्स कंपनीच्या सहा बस उभ्या होत्या. त्यावेळी रयत साखर कारखान्याला जाणारे ट्रॅक्टर व आठवडी बाजारामुळे तेथे वाहतूक कोंडी होती. त्याबाबत काही नागरिकांनी उंडाळे पोलिस दूरक्षेत्रच्या पोलिस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील यांना माहिती दिली. त्यांनी तेथे येऊन ट्रॅव्हल्सचे मालक विजय चिंचोळकर यांना गाड्या बाजूला काढण्यास सांगितले.

कऱ्हाड (जि. सातारा) : विश्वास नांगरे पाटील असो अथवा अन्य कोण आरटीओ.. कुणाचीच माझ्या गाडीला हात लावायची हिम्मत नाही, अशी धमकी तालुका पोलिस ठाण्यातील महिला फौजदारास खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस व्यावसायिकाने दिली. संबंधिताने केवळ धमकी दिली नाही, तर तो त्या महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. उंडाळे येथील भरचौकात हा प्रकार घडला असून भागात चर्चा सुरु आहे. या प्रकरणी विजय चिंचोळकर (रा. रांजणवाडी, ता. शिराळा) याच्यावर गुन्हा दाखल आहे. 

फौजदार दीपज्योती पाटील यांनी त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी उंडाळे येथे ट्रॅव्हल्स कंपनीच्या सहा बस उभ्या होत्या. त्यावेळी रयत साखर कारखान्याला जाणारे ट्रॅक्टर व आठवडी बाजारामुळे तेथे वाहतूक कोंडी होती. त्याबाबत काही नागरिकांनी उंडाळे पोलिस दूरक्षेत्रच्या पोलिस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील यांना माहिती दिली. त्यांनी तेथे येऊन ट्रॅव्हल्सचे मालक विजय चिंचोळकर यांना गाड्या बाजूला काढण्यास सांगितले. 

आरक्षण नाही मिळाले तर महाराष्ट्रातील सामाजिक घडी विस्कटेल : शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली भीती 

मात्र, चिंचोळकर यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरवात केली. विश्वास नांगरे पाटलांसह कुठल्या आरटीओची हिम्मत नाही माझ्या गाड्यांना हात लावायची, वर्दीत तुला घमेंडी आहे का, अशी सज्जड धमकी देत ट्रॅव्हल्स मालक त्यांच्या अंगावर धावून गेला. भरचौकात हा प्रकार सुरू होता. त्यामुळे नागरिकही जमा झाले. यावेळी त्याने पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकारही झाला. त्याबाबत पोलिस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील यांनी कऱ्हाड तालुका पोलिसांत तक्रार दिली, त्यानुसार गुन्हाही दाखल झाला आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travels Company Owner Threatens Police At Undale Satara News