
कऱ्हाडला लोकसंख्येच्या ३५ टक्के वृक्ष
कऱ्हाड - शहरात यापूर्वी एन्व्हायरो फ्रेन्डस् नेचर क्लबने स्वयंस्फूर्तीने २०१२ मध्ये केलेल्या वृक्षगणनेत २१ हजार ४६४ वृक्षांची नोंद झाली होती. त्यावेळी शहराची लोकसंख्या ५३ हजार ९३० इतकी होती. त्यानंतर नऊ वर्षांत तब्बल १५ हजार ५९० हजार वृक्षांची नोंद झाली आहे. यंदाच्या वृक्षगणनेत शहरात ३७ हजार ५४ वृक्षांची नोंद आहे. त्यात तीन मीटरपेक्षा कमी उंचीचे वृक्ष मोजलेले नाहीत. त्यामुळे वृक्षांची संख्या ४५ हजारांहून अधिक असण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे. शहराच्या लोकसंख्येच्या ३५ टक्के वृक्ष असलेले कऱ्हाड जिल्ह्यातील महत्त्वाचे व अव्वल शहर ठरले आहे. स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियान, पालिका व नागरिकांचे संगोपनामुळे शहरात नऊ वर्षांत प्रति वर्षी किमान दोन हजार वृक्ष वाढले आहेत.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपालिकेने वृक्षगणना केली. त्या आकडेवारीनुसार शहरात ३७ हजार ५४ वृक्षांची नोंद आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या पुढाकाराने अधिकृत वृक्षगणना झाली. पालिकेने बेसिल कंपनी आणि एन्व्हायरो फ्रेन्डस् नेचर क्लबकडे ते काम होते. कृष्णा घाटावरून वृक्षगणेस प्रारंभ झाला. वृक्षाचा घेरा १० सेंटीमीटर, किमान तीन मीटर उंचीचे वृक्ष असावे या निकषासह बाभळ, इलाईची चिंच आदी वृक्षगणनेतून वगळली. शहरात १६७ प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वयाची ८४, पाच ‘आजोबा वृक्ष’ म्हणजेच त्या वृक्षांचे वय १०० ते २०० वर्षांच्या आसपास आहे. पंताच्या कोटातील वटवृक्ष, गुरुवार पेठ मशिदीतील जंगली बदाम, शुक्रवार पेठेतील सात शहीद चौकातील पिंपळ, कोयना कॉलनीतील पिंपळ, शुक्रवार पेठ पंपिंग स्टेशनशेजारील पिंपळ या वृक्षांची नोंद ‘आजोबा वृक्ष’ आहे. मंडई परिसरातील वॉर्ड क्रमांक सातमध्ये सर्वांत कमी, तर वॉर्ड क्रमांक दोनमध्ये सर्वाधिक वृक्ष आहेत. वृक्ष नोंदीनुसार दाट लोकवस्तीमुळे शहरात कमी वृक्ष आहेत. शहराच्या ८६ हजार लोकसंख्येच्या प्रमाणात ३५ टक्क्यांपेक्षा जास्त वृक्ष आहेत. चार महिने मोजलेल्या प्रत्येक वृक्षावर क्रमांक आहेत. माझी वसुंधराच्या अॅपला ती नोंद घेतली आहे. संबंधित वृक्षाचा क्रमांक टाकल्यानंतर क्रमांकानुसार ३७ हजार ५४ वृक्षांची माहिती दिसते.
Web Title: Trees Make Up 35 Percent Of Karads Population
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..