देवदर्शनला जाताना काळाची झडप; दोन भावांचा मृत्यू, आईसह मुलगा गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Truck-Car Accident

स्वप्नीलनं 15 दिवसांपूर्वी नवीन चारचाकी गाडी घेतली होती.

देवदर्शनला जाताना काळाची झडप; दोन भावांचा मृत्यू, आईसह मुलगा गंभीर जखमी

दहिवडी (सातारा) : नव्या कोऱ्या चारचाकीनं उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने नागज फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या भीषण अपघातात कळसकरवाडी (ता. माण) येथील दोन चुलत भाऊ ठार झाले, तर आई व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबतची माहिती अशी, कळसकरवाडी येथील आनंदराव शिवराम पवार (वय ६८) यांचा मुलगा स्वप्नील याने १५ दिवसांपूर्वी नवीन चारचाकी गाडी घेतली होती. या गाडीचे सोमवारी कळसकरवाडी येथे पूजन केल्यानंतर आनंदराव पवार हे मुलगा स्वप्निल तसेच पत्नी उषा पवार व चुलतभाऊ माणिक साहेबराव पवार (वय ५८) यांच्यासोबत देवदर्शनासाठी गेले होते. तुळजापूरला (Tuljapur) भवानीमातेचे व पंढरपूरला (Pandharpur) विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर आज हे सर्व जण जोतिबाच्या दर्शनाला वाडी रत्नागिरीला निघाले होते.

हेही वाचा: भाजपच्या बोलघेवड्या नेत्यांना बसणार लगाम; 38 नेत्यांची यादी तयार

काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत होते. मिरजच्या दिशेने जाताना नागज फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथून काही अंतरावर गणेश पेट्रोल पंपासमोर गाडी आली असता चालक स्वप्नील पवार याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने मालवाहतूक करणाऱ्या जागेवर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत डाव्या बाजूला बसलेले आनंदराव पवार हे जागीच ठार झाले, तर त्यांच्या पाठीमागे असलेल्या माणिक पवार यांना उपचारासाठी नेताना त्यांचा मृत्यू झाला. उषा पवार व स्वप्नील पवार हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कळसकरवाडी व कुळकजाई ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. पवार बंधूंच्या अपघाती मृत्यूमुळे कुळकजाई परिसरावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: मातृत्वाला काळीमा! अवघ्या 15 दिवसांच्या बाळाला विकून आईनं खरेदी केला टीव्ही, कुलर

पवार कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले

आनंदराव पवार हे कुळकजाई विकास सोसायटीचे माजी अध्‍यक्ष असून, माणच्या पश्चिम भागात विशेषतः कुळकजाई भागात त्यांचे मोठे राजकीय वलय होते. त्यांनी १९९२ तर त्यांच्या पत्नीने १९९७ रोजी पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक लढवली होती. आमदार जयकुमार गोरे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. स्वप्नील पवार हा फर्ग्युसन ट्रॅक्टर कंपनीत पुणे येथे नोकरीला असून, लवकरच त्याचा साखरपुडा होणार होता. मात्र, आजच्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण पवार कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.

Web Title: Two Brothers Killed In Truck Car Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top