esakal | सातबारा उताऱ्यासाठी लाच घेताना तलाठी जाळ्यात; मसुरात 'लाचलुचपत'ची धडक कारवाई

बोलून बातमी शोधा

Bribe
सातबारा उताऱ्यासाठी लाच घेताना तलाठी जाळ्यात; मसुरात 'लाचलुचपत'ची धडक कारवाई
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : आजोबांच्या जमिनीचा सातबारा उताऱ्यासह सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या मसूर येथील तलाठ्यासह त्याच्या खासगी मदतनीसास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले. मसूर येथील तलाठी कार्यालयात आज दुपारी कारवाई झाली. त्याबाबत मसूरच्याच युवकाने तक्रार दिली होती. नीलेश सुरेश प्रभुणे (वय 45, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) असे तलाठ्याचे, तर रविकिरण अशोक वाघमारे (वय 27, रा. मसूर) असे त्याच्या खासगी मदतनीसाचे नाव आहे.

लाचलुचपत विभागाची माहिती अशी, मसूर येथील युवकाने त्याच्या आजोबांच्या नावाने मसूर येथील त्यांच्या जमिनीचा सातबाराचा उतारा व त्याच्या सर्च रिपोर्टसाठी अर्ज केला होता. बरेच दिवस त्याला ती कागदपत्रे देण्यासाठी टाळाटाळ होत होती. मागणी करूनही तलाठ्यासह मदतनीसाने त्याला कागदपत्रे दिली नाहीत. ती हवी असल्यास त्याला काही रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार दोघांतर्फेही तक्रारदार युवकाकडे दोन हजारांच्या लाचेची मागणी त्यांनी केली. त्यानुसार आज ती रक्कम देऊन कागदपत्रे नेणार होता. त्यापूर्वी संबंधित युवकाने त्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे त्यांची तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज त्याचा सापळा रचला.

कर्ज काढून पाहिलेलं स्वप्न डोळ्यांदेखत पुसलं; शेतकऱ्यांवर फुले तोडून फेकण्याची वेळ

पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार राजे, काटकर, येवले, भोसले, अडागळे आदींच्या पथकाने प्रत्यक्ष मसूरला सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार त्यांची कागदपत्रे नेण्यास आला. त्या वेळी त्याने दिलेले दोन हजार रुपये दोघांतर्फे एकाने स्वीकारले. त्या वेळी तेथे छापा टाकून स्वीकारलेल्या रकमेसह संबंधितांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. तलाठी प्रभुणे मलकापूर येथे राहतात. मात्र, ते मसूरचे तलाठी आहेत. त्यांचा मदतनीस रविकिरण वाघमारे हा मूळचा मसूरचाच आहे. त्या दोघांच्याही घरी तपासणी होणार आहे, असे लाचलुचपत विभागाने स्पष्ट केले.

Edited By : Balkrishna Madhale