esakal | कर्ज काढून पाहिलेलं स्वप्न डोळ्यांदेखत पुसलं; शेतकऱ्यांवर फुले तोडून फेकण्याची वेळ

बोलून बातमी शोधा

Flowers
कर्ज काढून पाहिलेलं स्वप्न डोळ्यांदेखत पुसलं; शेतकऱ्यांवर फुले तोडून फेकण्याची वेळ
sakal_logo
By
केशव कचरे

बुध (सातारा) : राज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. त्याचा फटका फक्त उधोगधंदे, व्यवसायानांच बसतोय, असे नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वर्षापासून शेती व्यवसायसुद्धा होरपळून निघत आहे. त्यातही कांदा उत्पादक व फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. बहुतांश ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्यामुळे फुलांना मागणी घटल्याने फुले तोडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

उत्तर खटाव परिसरातील युवा शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत खेळते भांडवल निर्माण करणारा व्यवसाय म्हणून फुलशेतीकडे वळला आहे. तालुक्‍यात 700 एकर क्षेत्रावर चारशेहून अधिक शेतकरी फुलशेती करत आहेत. मात्र, सध्या कोरोनामुळे मुंबई, पुण्यासह स्थानिक बाजारपेठेतही मागणी नसल्याने फुले तोडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मागील वर्षी लॉकडाउन झाल्यामुळे ऐन फुलांचा हंगाम वाया गेला होता. यंदा परिस्थिती सुधारेल या आशेवर असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे फुले उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कोरोनामुळे प्रार्थनास्थळे बंद आहेत. लग्नसोहळे, सण-उत्सवावर निर्बंध आहेत. त्याचा थेट परिणाम फूल व्यवसायावर झाला आहे. खटाव तालुक्‍याच्या उत्तर भागात भाजीपाला व फुलांची लागवड केली जाते.

वादळी वाऱ्यात 20 लाखांवर नुकसान; कऱ्हाडला पिकांसह घरांची मोठी पडझड

मोगरा, गुलाब, कार्नेशियन, जरबेरासह दिवाळी, दसरा व गौरी- गणपतीसाठी लागणाऱ्या झेंडूचे येथे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. त्याशिवाय राजापूर, बोथे, काटेवाडी परिसरातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता बॅंकेच्या कर्जातून ग्रीन हाऊसची उभारणी करून फुलशेतीचा व्यवसाय सुरू केला आहे. काटेवाडी येथील विनेश कचरे या तरुणाने स्टेट बॅंकेतून सुमारे सहा लाख रुपये कर्ज घेऊन फडतरवाडी (नेर) शिवारात पॉलीहाउसची उभारणी केली असून, त्यामध्ये जरबेराची लागवड केली आहे. त्यातून त्यांना दरमहा 25 ते 30 हजारांचे उत्पन्न मिळत होते. लग्नसराईत 50 हजारांपर्यंत उत्पन्नात वाढ होत होती. मात्र, गेल्या वर्षापासून फुलांना मागणीच नाही. परिणामी, झाडे जगवण्यासाठी फुले तोडून फेकून द्यावी लागत आहेत. फुलशेती व्यवसाय संकटात आला असून, तरुणांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

महाबळेश्वर, पाचगणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान

अचानक ओढवलेल्या कोरोना संकटामुळे फुलशेती करणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात फुले असूनही त्यांना बाजारपेठेत रास्त भाव मिळत नाही. वाढत्या कोरोनाच्या अफवेमुळे फुले बाजारात जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

-विनेश कचरे, जरबेरा उत्पादक, काटेवाडी

Edited By : Balkrishna Madhale