
‘उमेद’ टीम राज्यात अव्वल
सातारा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत कार्यरत सात हजार ११४ स्वयंसहायता समूहांना जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून १२० कोटींचे अर्थसाह्य उपलब्ध करून देत सातारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या चमकदार कामगिरीबद्दल सातारा जिल्हा ‘उमेद’ टीमचा गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन राज्यस्तरावर सन्मान करण्यात आला आहे.
ऑनलाइन पद्धतीने कर्ज प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची पद्धत अवलंबिण्यात आली. त्यामुळे बँक स्तरावर प्रलंबित असलेल्या कर्ज प्रस्तावांची माहिती रिझर्व्ह बँकेपर्यंत थेट पोचत असल्यामुळे कर्ज वितरणाच्या कामकाजास अधिक गती प्राप्त झाली. समूहांना तत्काळ कर्जवाटप व्हावे, यासाठी बँकनिहाय कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.
तालुकास्तरीय बँक जोडणी समन्वय समितीच्या बैठकांमध्ये जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या या माध्यमातून प्रलंबित कर्ज प्रस्तावांचे वाटप होण्यासाठी बँकांकडे थेट पाठपुरावा झाला. त्यामुळे सातारा ‘उमेद’ टीमने निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक उद्दिष्ट साध्य केले. कर्ज प्रस्ताव सादर करण्यासाठी चार हजार ९५० चे उद्दिष्ट असताना सात हजार ११४ (१४४ टक्के), तर अर्थसाहाय्य रकमेबाबत १०३ कोटी उद्दिष्टांच्या बदल्यात १२० कोटी साध्य करून ११७ टक्के उद्दिष्ट गाठले.
जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राज्यस्तरावर घेऊन जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक गंगोपाध्याय, भारतीय रिझर्व बँकेचे सहायक व्यवस्थापक संदीप कुलकर्णी, राज्य बँकर्स समितीचे सहायक व्यवस्थापक भरत बर्वे, अभियानाचे अतिरिक्त सचिव धनवंत माळी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन टीमला सन्मानित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई यांनी ‘उमेद’ टीमचे विशेष कौतुक केले. या कामगिरीसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक मनोज राजे, जिल्हा व्यवस्थापक स्वाती मोरे, जिल्हा व्यवस्थापक रंजनकुमार वायदंडे, प्रभाग समन्वयक सुनील सूळ यांनी विशेष प्रयत्न केले.
दिलेले उद्दिष्ट व साध्य
कर्ज प्रस्ताव :चार हजार ९५०, सात हजार ११४ (१४४ टक्के)
अर्थसाहाय्य :१०३ कोटी, १२० कोटी (११७ टक्के)
Web Title: Umed Team Tops List Work Beyond Purpose Help Groups Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..