uncleanliness in the civil Consequences of 32 employees not coming
uncleanliness in the civil Consequences of 32 employees not comingsakal

३२ कर्मचाऱ्यांना डच्चू दिल्याचा परिणाम; वॉर्डमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य

‘सिव्हिल’मध्ये स्वच्छतेचे तीन-तेरा
Published on

सातारा : पूर्व नियोजित उपाययोजना न करता कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम अचानक थांबविल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. काल दिवसभरात काही वॉर्डमध्ये अपुरे, तर काही ठिकाणी कर्मचारीच उपस्थित नसल्याने वॉर्डमध्ये स्वच्छतेअभावी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळ होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

जिल्हा रुग्णालयात आधीच मंजूर पदांपेक्षा स्वच्छता कर्मचाऱ्यांची पदे कमी आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांची १६४ मंजूर पदे असताना रिक्त, हजर नसलेले असे कर्मचारी वगळल्यास त्यातील ९० कर्मचारीच सध्या कार्यरत आहेत. त्यातील काही कर्मचारी अनेक दिवसांपासून हजरच नसतात, तर काही कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे केवळ ७० कर्मचारीच कामासाठी उपलब्ध आहेत. त्यातील रजा व सुट्यांवर असलेले वेगळेच. त्यांच्या जोडीला ३८ कंत्राटी स्वच्छता कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे रुग्णालयातील आंतर व बाह्य स्वच्छतेचा गाडा सुरळीत सुरू होता. पगार वेळेवर मिळाला नाही, तरी त्‍यांची जिल्हा रुग्णालयात अविरत सेवा सुरू होती. कोरोना संसर्गाच्या काळात आवश्यकतेमुळे रजा, साप्ताहिक सुट्या मिळाल्या नाहीत, तरी कर्मचाऱ्यांचे काम सुरू होते; परंतु या कर्मचाऱ्यांना तीन दिवसांपूर्वी तडकाफडकी काम थांबविण्यास सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेला कर्मचारी अत्यंत अपुरे पडत आहेत.

जिल्हा रुग्णालयामध्ये १९ वॉर्ड आहेत. या प्रत्येक वॉर्डमध्ये २४ तासांला किमान पाच कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. अतिदक्षता विभाग, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रियागृह अशा ठिकाणी सात ते नऊ कर्मचाऱ्यांची २४ तासांत गरज पडते; परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केल्याने हे गणित पुरते फिसकटले आहे. तीन वॉर्डमध्ये एका कर्मचाऱ्याला काम करावे लागत आहे.

आज गेट मीटिंग

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम थांबविल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नियोजन बिघडले आहे. आहेत त्यांच्यावर ताण वाढत आहे. या प्रश्नावर मार्गही निघताना दिसत नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनेच्या वतीने उद्या (ता. पाच) जिल्हा रुग्णालयात गेट मीटिंगचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये कर्मचारी संघटना पुढील धोरणाबाबत निर्णय घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com