
सातारा : प्रतापगड किल्ल्याची जागतिक वारसा स्थळात नोंद झाल्याने सातारकरांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सध्या सुरू असलेली किल्ला संवर्धन व सुशोभीकरणाची कामे यापुढेही पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली सुरू राहणार आहेत; पण जागतिक वारसा स्थळात नोंद झाल्यामुळे काही निर्बंधही येणार आहेत. युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवानगी घेऊनच येथे बदल करावे लागतील, तर दुसरीकडे प्रतापगड किल्ल्याची जागतिकस्तरावर ओळख निर्माण होऊन बाहेरच्या देशातील पर्यटक आपल्या जिल्ह्यात पर्यटनासाठी येऊन या ठिकाणाला भेट देतील. त्यातून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असून, संवर्धन व सुशोभीकरणासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधीही उपलब्ध होणार आहे.