वाळव्यास निघालेले बॅंक मॅनेजरला पुणे- बंगळूर महामार्गावर लुटले

तानाजी पवार
Monday, 21 December 2020

फिर्यादीवरून दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील तपास करीत आहेत.
 

वहागाव (जि. सातारा) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागावच्या (ता. कऱ्हाड) हद्दीत आयडीएफसी बॅंकेच्या व्यवस्थापकाला (मॅनेजर) दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रस्त्यात धारदार चाकूचा धाक दाखवून 55 हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. शनिवारी (ता. 19) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी व पाकिटातील तीन हजारांची रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लुटला. 

प्रदीप बबनराव पाटील (वय 37, मॅनेजर, आयडीएफसी शाखा, शनिवार पेठ, सातारा, मूळ रा. तांबवे, ता. वाळवा, सध्या रा. देवी चौक, शनिवार पेठ, सातारा) यांनी तळबीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी सायंकाळी प्रदीप पाटील हे साताऱ्याहून दुचाकीने महामार्गावरून तांबवेला (ता. वाळवा) निघाले होते. प्रवासादरम्यान वहागाव येथे दोन अनोळखी चोरट्यांनी पाठीमागून येत "तुझ्या गाडीने डॅश दिला आहे' असे म्हणून श्री. पाटील यांना गाडी आडवी मारली. गाडी थांबवून गाडीवरून खाली ओढून ढकलत सेवा रस्त्यावर नेत तेथे त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

धावत्या गाडीतून वेळीच उडी मारल्याने साताऱ्यातील मुलगा बचावला 

त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीची चेन हिसकावून घेतली. हातातील 17 हजार रुपये किमतीची अंगठी देत नसल्याने चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकीही दिली. खिशातील पाकिटातील तीन हजार रुपये, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गाडीची कागदपत्रे, एटीएम कार्ड व कागदपत्र हिसकावून घेत चोरट्यांनी तेथून पोबारा केला. फिर्यादीवरून दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील तपास करीत आहेत.

पालकांनाे! शिक्षणाधिकारी म्हणतात, प्राथमिक शाळा सुरु करण्याचा आदेशच नाही

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unidentified Persons Looted Bank Manager From Satara Crime News