esakal | कोरोनाबाधितांना गरजेनुसारच ऑक्‍सिजन द्या; प्रांताधिकाऱ्यांचे सक्त आदेश

बोलून बातमी शोधा

Uttam Dighe
कोरोनाबाधितांना गरजेनुसारच ऑक्‍सिजन द्या; प्रांताधिकाऱ्यांचे सक्त आदेश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरवडे (सातारा) : सह्याद्री कारखान्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमुळे रुग्णांची चांगली सोय होत आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ विचारात घेऊन, आवश्‍यक रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता भासू नये याची खबरदारी घ्या, अशा सूचना प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी केल्या.

कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी साखर कारखान्यांनी कोविड केअर सेंटर सुरू करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावरील सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये मागील वर्षी कोविड सेंटर सुरू केले आहे. ते यावेळीही सुरू करण्यात आले आहे.

सातारकरांनाे! पालिकेने सुरक्षिततेसाठी घेतला तातडीने निर्णय

त्याची पाहणी प्रांताधिकारी दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. संगीता देशमुख यांनी केली. त्या दरम्यान ते बोलत होते. सेंटरमध्ये कारखान्याकडून रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी, साबण, वाफारा घेण्यासाठी वाफेची भांडी, डॉक्‍टरांच्या सूचनेनुसार ऑक्‍सिजन पुरवठा करण्यात येत आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी सेंटरची माहिती देत पालकमंत्री पाटील यांचे सेंटरकडे विशेष लक्ष असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. घोगरे हे नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

Edited By : Balkrishna Madhale