पिंपोडे बुद्रुक - कोरेगावच्या उत्तर भागात पाण्यासह अन्य विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि श्रेयवादात दोन्ही प्रश्न अडकून पडल्याने परिसराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे विधानसभेला जनतेने या मतदारसंघात परिवर्तन घडवले.
त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे दोघे येथील विकासवाटा प्रबळ करतील, असा आशावाद येथील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
अर्थसंकल्पी अधिवेशनात आमदार सचिन पाटील यांनी उत्तर कोरेगावच्या शेतीच्या पाण्यासाठी आर्थिक तरतूद करून तो प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. त्याला कितपत यश मिळेल, याचे उत्तर अजितदादा उद्या येथील शेतकरी मेळाव्यात देतील का? याबाबत उत्सुकता आहे.
कॉरिडॉरमुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्याबाबतही अद्याप संभ्रमावस्था आहे. या भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या शोधात शहरे पालथी घालावी लागत आहेत. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबाबत सध्या तरी केवळ घोषणाबाजी सुरू आहे. गेली अनेक वर्षे येथील शेतकरी पाणी मागून कंटाळला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वसना उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन होऊन २५ वर्षे झाली. तरीही शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोचले नाही. शेतीसाठी शाश्वत पाणी आवश्यक असून, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
माजी खासदार निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी पाणीप्रश्न मार्गी लावण्याचा शब्द उत्तर कोरेगावच्या जनतेला दिला होता. त्यामुळे भागातील मतदारांनी दादांना साथ देत आमदार सचिन पाटील यांना मताधिक्य दिले. या पार्श्वभूमीवर उद्या (शनिवार) येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात अजितदादा काय घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वपूर्ण समस्यांवर दृष्टिक्षेप
वसना उपसा सिंचन योजनेसाठी भरीव निधीची गरज
वसना नदीच्या माथा आणि पूर्वेकडील सोळशी, पिंपोडे बुद्रुक व वाठार स्टेशन परिसरात पाण्याचा ठणठणाट
पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट.
पुणे-बंगळूर महामार्ग केवळ दहा किलोमीटर अंतरावर असूनही दुर्लक्षित.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.