कर्नाटकातील वृद्ध महिलेवर मायणीत बलात्कार

संजय जगताप
Friday, 11 December 2020

भर चौकात घडलेली घटना पोलिसांच्या निदर्शनास येणे आवश्‍यक होते. पोलिसांनी रात्रगस्त वाढवण्याची आवश्‍यकता असल्याची मागणी नागरिक करीत आहेत.

मायणी (जि. सातारा) : येथील वर्दळीच्या चांदणी चौकात व पोलिस दूरक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर एका वेडसर वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. संबंधित महिला कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील असून, घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.
 
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील चांदणी चौकात दहिवडी रस्त्याच्या बाजूला सनम वॉच ऍण्ड गिफ्ट हाऊस नावाचे दुकान आहे. दुकानासमोर एक वेडसर महिला जखमी अवस्थेत विव्हळत पडलेली आढळली. तिच्या डोक्‍यास व तोंडास जबर मार लागला हाेता, सकाळपासून बराच काळ उलटून गेला, तरीही ती महिला दुकानासमोरून निघून गेली नाही. त्यामुळे दुकान मालक सरफराज दारुवाले यांनी पोलिसांशी संपर्क साधला. जखमी अवस्थेतील महिलेबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आस्थेने महिलेची चौकशी केली. त्यानुसार सुमारे 60 ते 65 वर्षे वयोगटातील ती महिला असून, तिने तिचे नाव व गाव पोलिसांना सांगितले आहे.

तुटक्‍या फ्यूज बॉक्‍सने शेतकऱ्यांचा जीव धोक्‍यात; महावितरणच्या दुर्लक्षाने जिवास मुकण्याची भीती

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील ती रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्रीच्या सुमारास एकाने मारहाण करून बलात्कार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, घटना स्थळालगत दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिसांनी केली. त्यानुसार रात्री 11 ते सकाळी सातच्या दरम्यान महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. काळसर रंगाचा कोट व निळसर रंगाची पॅन्ट घातलेल्या अंदाजे 35 ते 40 वर्षे वयोगटातील पुरुषाने तिचे केस ओढून, डोके जमिनीवर आपटून हाताने मारहाण करीत असल्याचे, तसेच तिचे तोंड बांधून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दृष्टीस येत आहे. त्या संतापजनक घटनेची माहिती मिळताच वडूज पोलिस ठाणेच्या महिला पोलिस उपनिरीक्षक पालेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेची विचारपूस केली. 

त्यानंतर तिला उपचारार्थ वडूज ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयिताची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. दरम्यान, पोलिस दूरक्षेत्रपासून हाकेच्या अंतरावर आणि वर्दळीच्या चांदणी चौकात घडलेल्या दुर्दैवी व संतापजनक घटनेने नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. भर चौकात घडलेली घटना पोलिसांच्या निदर्शनास येणे आवश्‍यक होते. पोलिसांनी रात्रगस्त वाढवण्याची आवश्‍यकता असल्याची मागणी नागरिक करीत आहेत.

ब्रेकिंग: प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुजाला हृदयविकाराचा झटका, कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaduj Police Is Investigating Mayani Incident Of Karnataka Women Satara News