esakal | 'मला कोरोना झाला अन् तब्बल चार तास माझे पती बेडसाठी वणवण हिंडत राहिले'

बोलून बातमी शोधा

Coronavirus

'मला कोरोना झाला अन् तब्बल चार तास माझे पती बेडसाठी वणवण हिंडत राहिले'

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

सातारा : गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात कोरोनाच्या महामारीने राज्यात प्रवेश केला. देशव्यापी लोकडाउन झाला, घरातून बाहेर पडू नका आणि कोरोनाला हरवा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांचे आवाहन योग्य होते. पण, माझं कार्यक्षेत्र रक्तपेढी चालवण्याचे असल्याने व ही अत्यावश्‍यक सुविधेमध्ये येत असल्याने घरी थांबणे शक्‍यच नव्हते. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यावर मर्यादा आल्या होत्या. अशा बिकट परिस्थितीतही श्री भवानी प्रतिष्ठान संचलित महालक्ष्मी ब्लड बॅंकेतर्फे आम्ही अंतराचा विचार न करता खेडोपाडी जाऊन स्वतःची काळजी घेत, शासकीय निकषांचे पालन करून रक्तदान शिबिरे घेतली. त्यातून रुग्णांची रक्ताची गरज भागली. इतकी काळजी घेऊनही जे नको होते ते झालेच. मलाच कोरोनाची बाधा झाली. लक्षणे जाणवायला लागली तेव्हा सोलापूर येथील कोविड विभागाची प्रमुख असलेल्या डॉ. वैशाली यांच्या सल्ल्यानुसार घरी स्वतःचे विलगीकरण करून घेतल्याचे कऱ्हाडच्या वीणा ढापरे यांनी सांगितले.

दोन दिवसांनी चव गेली, कोरोनाची अँटीजेन चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर सीटी स्कॅन केला. एचआरसीटी स्कोअर नऊ होता. कोरोनाचे फुफ्फुसात संक्रमण सुरू झाले होते. डॉ. वैशाली यांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात ऍडमिट होण्याचा निर्णय घेतला. रुग्णांसाठी बेडची टंचाई होती. चार तास माझे पती बेडसाठी वणवण हिंडत होते. शेवटी श्री हॉस्पिटलमध्ये रात्री दोन वाजता बेड मिळाला. तेथील डॉक्‍टरांनी प्रथम मला धीर दिला. तुम्ही पॉझिटिव्ह राहून उपचार घेतले, तर कोरोना निगेटिव्ह होईल, असे त्यांनी सांगितले. घरात पती, मुलगा, मुलगी काळजीत होती. मुलीने घरातील स्वयंपाक केला. मला तिने घरचे अन्नही दिले. त्यानंतर दोन दिवसांनी त्या तिघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. मनाला उभारी आली. दोन दिवस अपचनाचा त्रास झाला. त्यानंतर मात्र बरे वाटू लागले.

आयुष्यभर शेतीत काबाड कष्ट करून शरीराबरोबर मनानंही कणखर साथ दिली आणि मी पुन्हा..

सहा दिवसांत डिस्चार्ज मिळाला. डॉक्‍टरांच्या सल्ल्याप्रमाणे पुढील सहा दिवस विलगीकरणात राहिले. मुलीने सकस अन्न दिले, तर मुलाने डबा आणून दिला. त्याच्याशी लांबून बोलावे लागायचे. मनाला कसं तरीच वाटायचे. पण, कुटुंबाच्या भल्यासाठी ते करावेच लागले. सहा दिवसांनी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आणि मी कोरोनामुक्त झाले. कोरोना लागण झालेल्या दिवसांत बरेच काही शिकले. जवळच्या माणसांनी खूप धीर दिला. मुलीला जबाबदारीची जाणीव झाली. डॉ. वैशालीने योग्य मार्गदर्शन केले. त्यातून मनाला उभारी मिळाली. सकारात्मक विचारातून कोरोनाशी लढण्याचे बळ मिळाले. त्यानिमित्ताने सर्वांना सांगणे आहे की, कठीण परिस्थितीत काळजी घ्या. कोरोनाची बाधा झालीच तर सकारात्मक विचार ठेवा. कोरोना नक्की बरा होतो, मनाने ठाम राहिलो तर डॉक्‍टरांच्या उपचारांना नक्कीच यश मिळते. तेव्हा कोरोनाला घाबरू नका, तर कोरोनाशी लढा!

Edited By : Balkrishna Madhale