esakal | आयुष्यभर शेतीत काबाड कष्ट करून शरीराबरोबर मनानंही कणखर साथ दिली आणि मी पुन्हा..

बोलून बातमी शोधा

Corona Virus
आयुष्यभर शेतीत काबाड कष्ट करून शरीराबरोबर मनानंही कणखर साथ दिली आणि मी पुन्हा..
sakal_logo
By
ऋषीकेश पवार

सातारा : सर्वतोपरी काळजी घेऊनही मागील महिन्यात कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. माझ्यासोबत मुलगा आणि सून हेही पॉझिटिव्ह सापडल्यामुळे कुटुंबावर अचानक संकट कोसळले. वयाच्या 90 व्या वर्षी कोरोनाने संक्रमित झाल्याने घरचे सर्वच सदस्य चिंतेत पडले. रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने कोरोनाचा धोका सर्वांत जास्त वृद्ध व्यक्तींना असतो, असे ऐकून असल्याने सुरुवातीला माझाही थरकाप उडाला होता. पण, धाकटा मुलगा कृष्णातने कोरोनामधून रुग्ण बरे होऊ शकतात, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही, घाबरून जाऊ नकोस, असा मानसिक व भावनिक आधार दिल्यामुळे थोडासा धीर मिळाला.

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येण्याच्या काही दिवस आधीच माझी छोटीशी शस्त्रक्रिया झाली होती. यातून सावरत असतानाच हा प्रकार घडल्याने मुलाने सातारा येथील खासगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनीही क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ उपचार सुरू केले. त्यावेळी कोरोनाशी खरी झुंज सुरू झाली. सुरुवातीला दोन दिवस ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत होता. त्यावेळी माझा मुलगा, सून आणि डॉक्‍टर्स यांनी या कालावधीत उत्तम वैद्यकीय सेवेबरोबरच मानसिक व भावनिक आधार दिला. त्यामुळे कोरोनाबाबतची माझी भीती खूपच कमी झाली. रोगप्रतिकारकशक्तीबरोबरच इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वपूर्ण असते, याची जाणीव मला त्यावेळी झाली. माझ्यावर औषधोपचार सुरू झाले.

एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं..

दोनच दिवसांत ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास हळूहळू कमी होत गेला. पण, मी एवढ्यावरच थांबले नाही. वेळ मिळेल तसा श्वसनाचे व्यायाम करू लागले. त्यामुळे माझ्या ऑक्‍सिजन लेवलमध्ये सुधारणा होत गेली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीदेखील व्यवस्थित काळजी घेतली. माझ्याकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष दिले. डॉक्‍टरांनी दिलेली औषधे वेळेत घेणे, सकस आहारावर जोर देणे हा पॅटर्न तंतोतंत पाळला. लहानपणापासूनच माळकरी असल्याने मांसाहार टाळून वेळेवर पौष्टीक शाकाहारी जेवणासोबतच सकाळ-संध्याकाळ फळे खाण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास चांगलीच मदत झाली. आहारासोबतच डॉक्‍टर्स आणि नर्स यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. उपचाराला साथ दिली. त्यामुळे कमी कालावधीत माझ्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली.

लसीकरणासाठी पुरेशी केंद्रे सुरु करा; खासदार उदयनराजेंचा आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्ताव

आयुष्यभर शेतीत कष्ट करून शरीराबरोबरच मनानेही कणखर असल्याने प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मकतेच्या जोरावर आणि डॉक्‍टरांच्या यशस्वी उपचारांमुळे मी कोरोनावर यशस्वीपणे मात करून पुन्हा घरी येऊ शकले. खरं तर कोरोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. कोरोनाची भीती अनाठायी आहे. कोणतीही भीती न बाळगता सकारात्मक विचार करा. आपण कोरोनाला नक्की हरवू शकतो. मी देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोरोनावर मात करून त्यामधून पूर्णपणे बरी झाली आहे. असे असले तरी प्रशासनाच्या सूचनांचे पालन आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास या आजारापासून नक्की बरे होता येते, हे पक्के लक्षात ठेवा.

Edited By : Balkrishna Madhale