esakal | दहा दिवसांच्या एकांतवासातून बरंच काही शिकलो अन् कोरोनाला हरवलोच!

बोलून बातमी शोधा

Corona Virus
दहा दिवसांच्या एकांतवासातून बरंच काही शिकलो अन् कोरोनाला हरवलोच!
sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : कानावर येणाऱ्या विविध अफवांवरून कोरोना आहे की नाही, याची आधी खात्रीच नव्हती. परंतु; प्रत्यक्षात जेव्हा तो अनुभवायला मिळाल्यावर खात्री पटली. गेल्या दहा दिवसांत एकच बाब शिकलो, ती म्हणजे लवकर तपासणी करा आणि पुढच्या अडचणी टाळा. स्वत:, पत्नी व मुलाने यशस्वीरित्या कोरोनाशी मुकाबला केलेले प्रदीप नलवडे हे अगदी कळकळीने सांगत होते...

दहा दिवसांपूर्वी घसा खवखवू लागला होता, कणकणी होती आणि अंग खूप दुखत होते. ओळखीच्या एमडी मेडिसीन डॉक्‍टरांकडून तीन दिवसांची औषधे घेतली. परंतु, औषधाचा प्रभाव कमी व्हायला लागला की सायंकाळी पुन्हा तीच लक्षणे जाणवायला सुरवात व्हायची. कोरोनाच्या वाट्याला जायला नको, असेच नेहमी वाटायचे. त्यामुळे चाचणी करण्यापासून नेहमी लांब राहायचो. एका मित्राने कोरोना चाचणीचा सल्ला दिला. वेळ घालवू नकोस, तातडीने कोरोना चाचणी कर, लवकर उपचार सुरू केले की काही होत नाही, घरीच बरा होशील, असे सांगत त्याने धीर दिला. थोडी काळजी वाटत होती. परंतु, धाडस केले. त्यामुळे पत्नीला घेऊन जिल्हा रुग्णालयात गेलो. आरटीपीसीआर चाचणी करायची होती. परंतु, आधी रॅट चाचणी करा, असे त्यांनी सांगितले. रॅट करून अर्धा तास रुग्णालयाच्या आवारातच थांबलो. अर्ध्या तासानंतर गेल्यावर आरटीपीसीआर करायची गरजच भासली नाही. दोघेही पॉझिटिव्ह आलो होतो.

Video पाहा : ग्रामस्थांनी एकीतून उभारले आयसोलेशन सेंटर

खरं तर एकदा पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर मनावरचा निम्मा ताण हलका झाला होता. आता काय, याचे उत्तर जिल्हा रुग्णालयात चाचणी केली त्याच ठिकाणी मिळाले. शेजारच्याच खिडकीत औषधे देण्याची सोय केलेली होती. त्या ठिकाणी दोघांना औषधे दिली. कशी खायची, हे समजावून सांगितले. त्यानंतर ऑक्‍सिमीटरची व्यवस्था केली आणि घरी गेलो. लवकर निदान झाल्याने ऑक्‍सिजन लेव्हलही चांगली होती. गेल्या दहा दिवसांत भरपूर खायचे, औषधे घ्यायची आणि आराम करायचा, हाच दोघांचा दिनक्रम होता. पाच दिवसांनंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात जावून औषधे घेतली. आता दोघेही बरे आहोत.

हेही वाचा: मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची! पालकमंत्र्यांची सून आरोग्य सेवेत

दरम्यानच्या काळात मुलाचे टेन्शन होते. मला लक्षणे जाणवायला लागल्यावर त्याला मामाकडे पाठविले होते. परंतु, आम्ही पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसांनी त्यालाही ताप आला. त्याचीही तातडीने तपासणी केली. तीही पॉझिटिव्ह आली. दोघेही थोडे घाबरलो होतो. जिल्हा रुग्णालयातच बालरोग तज्ज्ञांना दाखविले. त्यांच्या औषधावर तोही लवकरच बरा झाला. दहा दिवसांच्या एकांतवासातून खूप काही शिकलो. मोबाईल व वृत्तपत्रातून बेड उपलब्ध नसल्याचे, रुग्ण दगावात असल्याचे पाहात होतो. परंतु, मी मात्र घरात समाधानी होतो. हॉस्पिटलची, ऑक्‍सिजन बेड, इंजेक्‍शनसाठीच्या धावाधावापासून सुटका झाली. घरच्या घरी कोरोनावर मात केली होती. त्याला कारण एकच ती म्हणजे मी लवकरच कोरोनाची चाचणी केली. त्यामुळेच माझे कुटुंब आज सुरक्षित आहे. लवकर तपासणी करा व घरच्या घरी बरे व्हा, कोरोनावर मात करणारा हा एकच मंत्र असल्याचे मी शिकलोय.

Edited By : Balkrishna Madhale