esakal | 'डॉक्‍टर नगराध्यक्षांना कोणतेही गांभीर्य नाही'

बोलून बातमी शोधा

Wai Muncipal Council Building
'डॉक्‍टर नगराध्यक्षांना कोणतेही गांभीर्य नाही'
sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व शहर विकासकामांसंदर्भात बोलावलेली पालिकेची सर्वसाधारण सभा सत्ताधारी व विरोधकांतील योग्य समन्वयाअभावी पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारात तहकूब केली. याबाबत उपनगराध्यक्ष व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहेत.

पालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिली होती. या सभेला उपनगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ व सर्व सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात येत होते. या वेळी मागील (26 मार्च ) सभा झालेली नाही, तर त्याच्या इतिवृत्ताची नोंद कशी घेणार असा प्रश्न उपनगराध्यक्ष सावंत यांनी उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी मागील सभेत विविध विषयांवर सर्वानुमते चर्चा झाली आहे. सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मंजूर व नामंजूर विषयाबाबत निर्णय झालेला आहे.

'अधिकारी थेट पैसे मागण्याचे धाडस करतो जेव्हा त्याला राजकीय वरदहस्त असतो'

या वेळी मला न विचारता विषय कसे मंजूर केले, असे उपाध्यक्ष सावंत यांनी पुन्हा विचारले. त्यामुळे मागील सभेबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याने नगराध्यक्षा डॉ. शिंदे यांनी मागील आणि आजची या दोन्ही सभा स्वतःच्या अधिकारामध्ये तहकूब करत असल्याचे सांगितले. त्या ऑनलाइन सभेतून बाहेर पडल्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने ज्ञानदीप हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे निश्‍चित केले आहे. आजची सभा तहकूब करू नये, अशी विनंती प्रदीप चोरगे, भारत खामकर दीपक ओसवाल, चरण गायकवाड आदी सदस्यांनी केली. मात्र, नगराध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारांमध्ये मागील सभा झाली नाही, मग ही सभा नको, असे म्हणत स्वतःच्या अधिकारात आजची सभा रद्द केली. त्यामुळे उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. गोंधळ केला. मात्र, तहकूब सभा पुन्हा घेण्यास नगराध्यक्षांनी नकार दिला. सत्ताधारी व विरोधकांतील योग्य समन्वयाअभावी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभा रद्द झाल्याने शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पालिकेच्या मागील (ता. 26 मार्च) सभेत घेतलेल्या निर्णयावर उपनगराध्यक्ष व सदस्य समाधानी नसल्यामुळे सभेबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल घेऊन पुन्हा चर्चेसाठी ठेवण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येईल. त्यामुळे आजची सभाही तहकूब करण्यात आली असून, 29 एप्रिल रोजी पुन्हा बैठक घेण्यात येईल.

डॉ. प्रतिभा शिंदे, नगराध्यक्षा, वाई

आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना कॉंग्रेस धडा शिकवेल

कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत डॉक्‍टर असणाऱ्या नगराध्यक्षांना कोणतेही गांभीर्य नाही. या सभा तहकुबीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा मागवून योग्य ती कारवाई करावी अन्यथा उद्या नगराध्यक्षा व प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पालिका कार्यालयात टाळे ठोकणार आहे.

अनिल सावंत, उपनगराध्यक्ष

हेही वाचा: काळजी मिटली! काेराेनाबाधित मुलांसाठी सिव्हीलला स्वतंत्र वॉर्ड