esakal | काळजी मिटली! काेराेनाबाधित मुलांसाठी सिव्हीलला स्वतंत्र वाॅर्ड

बोलून बातमी शोधा

Childrens
काळजी मिटली! काेराेनाबाधित मुलांसाठी सिव्हीलला स्वतंत्र वॉर्ड
sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या जिवाला धोका होण्याचे काही प्रकार समोर आल्यामुळे जिल्हा रुग्णालय व्यवस्थापन सजग झाले असून, जिल्ह्यातील लहान मुलांवर योग्य उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांवर सुरक्षित व योग्य उपचाराची सुविधा निर्माण झाली आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेल्या 15 दिवसांमध्ये थैमान घातले आहे. दररोज हजारपेक्षा जास्त नागरिक कोरोनाबाधित निघत आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध असलेले बेड अपुरे ठरत आहेत. खासगी रुग्णालयांमध्येही बेड उपलब्ध होत नाहीत. व्हेंटिलेटर बेड्‌सची अत्यंत बिकट अवस्था आहे. आवश्‍यकता असूनही रुग्णाला केवळ ऑक्‍सिजन बेडवर ठेवावे लागत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये 15 व्हेंटिलेटर बेडची सुविधा असलेला अतिदक्षता विभाग तयार करण्यात येत आहे. आणखी ऑक्‍सिजन बेडची सुविधाही तयार केली जात आहे.

हेही वाचा: चिंताजनक! साताऱ्यात कोरोना कहर सुरुच; जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढली

या सुविधा होत असताना जिल्ह्यामध्ये लहान मुलांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र कोरोना वॉर्डची सुविधा उपलब्ध नव्हती. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये लहान मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर एखाद्या मुलाला कोरोना झाल्यास तो घरच्या घरी होम आयसोलेशनमध्ये बरा होईल, इतपतच आजाराची तीव्रता होती. दुसऱ्या लाटेमध्ये काही नवीन स्टेन समोर आले आहेत. त्यामध्ये लहान मुलांनाही कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर आले आहे. तसेच बाधा झालेली मुलेही काही ठिकाणी गंभीर झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळी अकरानंतर किराणा मालासह दारु घरपाेच मिळेल; वाचा नवा आदेश

लहान मुलांच्या या परिस्थितीबाबत जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने पावले उचलली आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव यांनी जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र कोरोना वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांचा वॉर्ड हा 20 बेडचा कोरोना वॉर्ड करण्यात आला आहे. या सुसज्ज वॉर्डमध्ये सेंट्रल ऑक्‍सिजनची सुविधा आहे. त्याचबरोबर एखाद्या मुलाला आवश्‍यकता भासल्यास व्हेंटिलेटरचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर परिस्थितीतही मुलांवर उपचार करणे शक्‍य होणार आहेत.

जिल्हा रुग्णालयातील अनुभवी बालरोग तज्ज्ञ डॉ. अरुंधती कदम, डॉ. उल्का झेंडे, डॉ. शार्दुल कणसे, डॉ. अमोल पवार, डॉ. दीपाली हे मुलांवर उपचार करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मुलांवर उपचाराची चांगली सुविधा निर्माण झाली आहे.

21 दिवसांच्या बाळावर उपचार

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक लहान मुलांवर उपचारासाठी शर्थ करत आहेत. सध्या दाखल असणाऱ्या मुलांमध्ये एक 21 दिवसांचे बाळही आहे. त्याचबरोबर कोरोना वॉर्डमध्ये चार महिने, 36 दिवस, तसेच 11 वर्षांचीही मुले आहेत. सध्या पाच बालकांवर उपचार सुरू आहेत.

Coronavirus : बेड मिळविण्यासाठी वशिलेबाजी; स्थानिक नेतेमंडळींची गोची!