Koyna Dam : खासदार श्रीनिवास पाटलांनी करुन दाखवलं; दुर्गम भागातील 245 गावांना मिळाला मोठा दिलासा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrinivas Patil

कोयना धरणाच्या पश्चिमेस अतिशय दुर्गम डोंगराळ भागांमध्ये २४५ हून ज्यादा गावे स्थित आहेत.

Koyna Dam : खासदार श्रीनिवास पाटलांनी करुन दाखवलं; दुर्गम भागातील 245 गावांना मिळाला मोठा दिलासा!

कऱ्हाड : कोयना धरणाच्या (Koyna Dam) शिवसागर जलाशयात वसलेल्या गावांना आरोग्य सेवा पुरवण्याकरिता वॉटर ॲम्ब्युलन्सला मंजुरी मिळाली आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्‍या प्रयत्नाला अखेर यश आलं आहे. त्यासाठी सुमारे 94 लाखाचा निधी उपलब्ध होणार आहे.

ती वॉटर ॲम्ब्युलन्स महाबळेश्‍वर (Mahabaleshwar) तालुक्यातील तापोळा परिसरात कार्यरत होणार आहे. जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील कोयनेच्या शिवसागर जलाशयामध्ये बसलेल्या गावांना आरोग्याची उत्तम सोय मिळावी यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्यविषयक समस्या सुटाव्यात यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त यांच्याकडं दूरध्वनीद्वारे व लेखी पाठपुरावा केला होता.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात वॉटर ॲम्ब्युलन्स खरेदी करण्यासाठी व इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी निधी मंजूर होत असल्याचे खासदार पाटील यांना काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे कळवले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एक वॉटर ॲम्ब्युलन्स करिता मंजुरी मिळाली आहे. त्या वॉटर ॲम्ब्युलन्सचा (Water Ambulance) वापर तापोळा परिसरात होणार आहे. जावळी तालुक्यातील बामणोली परिसरासाठी दुसरी वॉटर ॲम्ब्युलन्स मंजूर होण्याकरिता प्रशासनाकडून सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

कोयना धरणाच्या बॅक वॉटरच्या पश्चिमेस अतिशय दुर्गम डोंगराळ भागांमध्ये २४५ हून ज्यादा गावे स्थित आहेत. या ठिकाणी जलद दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. धरण पाणी पातळीत वाढ झाल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ह्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून दुर्गम आणि डोंगरी भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आरोग्यविषयक अडचणीच्या काळात इतर ठिकाणी जाण्यासाठी व आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महत्वपूर्ण मदत होणार आहे. त्यामुळं स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.