
नदीतील पाणीपातळी वाढणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कुणीही जीव धोक्यात घालून नदीपात्र ओलांडू नये, असे आवाहन पत्रकात केले आहे.
ढेबेवाडी (जि. सातारा) : रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार बुधवारपासून (ता. 20) मराठवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यंदाच्या रब्बी हंगामातील हे दुसरे आवर्तन असून कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील विविध गावांतील शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
सांडव्याच्या बांधकामानुसार मराठवाडी धरणातील पाणीसाठा प्रतिवर्षी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे. धरणाची मूळ पाणी साठवण क्षमता 2.73 टीएमसी असली तरी सद्य:स्थितीस त्यात 1.4 टीएमसी पाणीसाठा होत आहे. गेल्या पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या धरणात काही दिवसांपूर्वीच झालेल्या पहिल्या आवर्तनानंतर 1.1 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असला तरी तो लाभक्षेत्राला उन्हाळभर देऊनही शिल्लक राहणार आहे. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर धरणातून तत्काळ पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.
Gram Panchayat Results : क-हाड, फलटणला उमेदवारांचा आनंद पारावार; चिठ्ठीने जिंकविले
त्यानुसारच बुधवारी सकाळी दहा वाजता या रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन होत आहे. याबाबत जिहे-कटापूर प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचे सहायक अभियंता एन. ए. सुतार यांनी पत्रकाव्दारे संबंधित विभागांना कळविले आहे. नदीतील पाणीपातळी वाढणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कुणीही जीव धोक्यात घालून नदीपात्र ओलांडू नये, असे आवाहन पत्रकात केले आहे.
हॉटेल, ढाबे, खानावळी बंद ठेवा : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Edited By : Siddharth Latkar