गरमागरमी : वातावरणात अन्‌ आखाड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather Maharashtra kesari Sweating due heat satara

गरमागरमी : वातावरणात अन्‌ आखाड्यात

सातारा : येथे सुरू असणाऱ्या महाराष्‍ट्र केसरीच्‍या आखाड्यात विविध वजनी गटांत एकमेकांना भिडत असून, एकमेकांची ताकद आजमावत असतानाच तापलेल्‍या सूर्यदेवामुळे मल्‍लांची दमछाक होत आहे. आकाशात तापलेला सूर्य आणि आखाड्यातील ताकदीशी भिडत यामुळे मैदानात गरमागरमी होत असून, दुसऱ्या दिवशी सकाळच्‍या सत्रात स्‍पर्धेची रंगत वाढीस लागल्‍याचे दिसून आले.

महाराष्‍ट्र केसरीच्‍या स्‍पर्धेचे मंगळवारी उद्‌घाटन झाल्‍यानंतर सलामीचे सामने झाले. या सामन्‍यांत बाजी मारणाऱ्या मल्‍लांच्‍या विजेतेपदासाठीच्‍या लढती बुधवारी सकाळी जिल्‍हा क्रीडा संकुलाच्‍या आखाड्यात सुरू झाल्‍या. सकाळी आठ वाजता हलगीच्‍या तालावर सुरू झालेल्‍या या लढती नंतरच्‍या काळात विशेषत: रंगतदार होत गेल्‍या. साडेआठनंतर उन्‍हाचा तडाखा वाढल्‍यानंतर मल्‍लांच्‍या कार्यक्षमतेवर आणि चपळतेवर परिणाम होण्‍यास सुरुवात झाली. उन्‍हाच्‍या झळा आणि घामाच्‍या धारांनी निथळतच मल्‍ल आखाड्यात दाखल होत होते. पुकारा झाल्‍यानंतर माती आणि गादी गटात खेळणाऱ्या या मल्‍लांना एकेमकांच्‍या ताकदीबरोबरच तापलेला सूर्य आणि निथळत्‍या घामाच्‍या धारांचा सामना करावा लागत होता. या वातावरणातच दिलेल्‍या वेळेत मल्‍ल एकमेकांना भिडत कुस्‍त्‍या पूर्ण करत होते.

दोन माती तर तीन गादी प्रकारातील आखाड्यात सुरू असणाऱ्या कुस्‍त्‍यांमध्‍ये सकाळच्‍या सत्रात तृतीय क्रमाकांच्‍या कुस्‍त्‍यांची तांत्रिकता पूर्ण करण्‍यात आली. या तांत्रिकतेदरम्‍यान मातीपेक्षा गादी प्रकारातील आखाड्यात कुस्‍ती लढणाऱ्या मल्‍लांना उन्‍हाच्‍या तीव्रतेचा आणि मॅट तापल्‍याच्‍या बाबीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता.

सूर्य पुढे सरकेल तसे तापमान वाढत चालल्‍याने सकाळच्‍या सत्रातील निर्धारित सामने संपल्‍यानंतर सत्र समाप्‍तीची घोषणा सामना संयोजकांनी केली.

मल्‍लांना हवा निवारा

सकाळच्‍या सत्रात होणाऱ्या कुस्‍त्‍यांसाठी मल्‍ल पुकारा होण्‍यापूर्वीच आखाड्यालगतच्‍या मोकळ्या जागेत येऊन बसत असतात. उन्‍हाचा तडाखा वाढीस लागल्‍यानंतर हे मल्‍ल अक्षरक्ष: घामाने निथळत असत. घामाच्‍या धारांमुळे शरीरातील कमी होणारी पाणीपातळी राखताना मल्‍लांना कसरत करावी लागत होती. मैदानात खेळणारे मल्‍ल, प्रशिक्षक, पंचांना अनेक वेळा पाणी मिळणे देखील दुरापास्‍त होत असल्‍याचे अनेक वेळा दिसून आले. संयोजकांनी मल्‍ल व इतरांना आवश्‍‍यक असणारे पाणी पुरवण्‍याबरोबरच लढतीसाठी आखाड्याजवळ आलेल्‍या मल्‍लांना तात्‍पुरता निवारा उभारणे आवश्‍‍यक आहे.

प्रशिक्षकांची घालमेल

सकाळच्‍या सत्रात कुस्‍त्‍या सुरू असताना आखाड्याजवळ खेळणाऱ्या मल्‍लांचे पंच उपस्‍थित होते. आखाड्यातील मल्‍ल एकमेकांची ताकद आजमावत असतानाच प्रशिक्षक आपल्‍या शागिर्दांना धर-धर, पकड मजबूत ठेव, दमलाय बघ त्‍यो, तू दमू नको, तापलाय त्‍यो, पटात हात घाल, असा सूचना देत मैदानात खेळणाऱ्यांना सूचना देत होते. घड्याळातील सेकंद काटा पुढे सरकत असतानाच भिडणाऱ्या मल्‍लांपेक्षा त्‍यांच्‍या प्रशिक्षकांची सेकंदा सेकंदाला उत्‍कंठा वाढीस लागल्‍याचे या वेळी दिसून आले.

Web Title: Weather Maharashtra Kesari Sweating Due Heat Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..