काँग्रेस, शिवसेना कोणाला साथ देणार? आबा, दादांच्या पॅनेलमध्ये थेट लढत I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress ShivSena NCP

किसन वीर कारखान्याची निवडणूक यावेळेस शेतकरी सभासदांनी हातात घेतली आहे; पण...

काँग्रेस, शिवसेना कोणाला साथ देणार? आबा, दादांच्या पॅनेलमध्ये थेट लढत

सातारा : किसन वीर साखर कारखान्याची निवडणूक (Kisan Veer Sugar Factory Election) दिवसेंदिवस रंगतदार होऊ लागली असून, भाजपचे नेते व माजी आमदार मदन भोसलेंच्या (Madan Bhosle) पॅनेलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांचे पॅनेल, अशी लढत सध्यातरी दिसत आहे. पण, शेतकरी सभासदांच्या मुद्द्यावर रिंगणात उतरलेली काँग्रेस आणि शिवसेना कोणासोबत जाणार, याची उत्सुकता आहे. काँग्रेसचा (Congress) निर्णय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १९ एप्रिलला असल्याने त्याच दिवशी नेमके किती पॅनेल व कोण कोणाला साथ देणार, हे निश्चित होणार आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंवरील टीकेनंतर शालिनीताईंचा प्रकाश आंबेडकरांच्या मुलावर प्रहार

किसन वीर कारखान्याची निवडणूक यावेळेस शेतकरी सभासदांनी हातात घेतली आहे. पण, वाढलेल्या सभासदांची साथ मदन भोसले यांच्या पॅनेलला मिळणार, अशी चर्चा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या मकरंद पाटील व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना ही निवडणूक जिंकावी लागणार आहे. तरच ते हा कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकणार आहेत. त्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे. मागील वेळी राष्ट्रवादीचे (NCP) पॅनेल नव्हते. शिवसेनेने काही जागा लढवल्या होत्या. शेतकरी सभासदांनी काही जागा लढल्या होत्या. तुल्यबळ विरोधक नसल्याने मदन भोसलेंच्या ताब्यातच हा कारखाना राहिला होता.

हेही वाचा: राज्यात जातीय दंगल घडवून सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न : जयंत पाटील

यावेळेस कारखान्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. त्यामुळे यातून मार्ग काढून कारखान्याचे गाळप करणे महत्त्‍वाचे होते. पण, ऐन निवडणुकीतच मदन भोसले यांनी कारखान्याचे गाळप सुरू केल्याने विरोधकांना धक्का बसला आहे. सध्या तरी राष्ट्रवादी व भाजप या दोन पॅनेलमध्येच लढत रंगण्याची चिन्हे असल्याचे चित्र आहे. या वेळेस शिवसेना व काँग्रेसही रणांगणात आहे. काँग्रेसने काही जागांवर अर्ज भरले आहेत. पण, ते राष्ट्रवादीच्या पॅनेलसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भातील निर्णय पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. तर शिवसेनेच्या वतीनेही काही अर्ज भरले आहेत. त्यामुळे त्यांची साथ कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. मागील वेळी शिवसेना स्वतंत्र लढली होती. आमदार महेश शिंदे यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. एकूणच विद्यमान अध्यक्ष मदन भोसलेंच्या विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनाही असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. पण, नेमके चित्र हे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजे १९ एप्रिलला स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: 'सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीसारख्या यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर'

काँग्रेस न्यायालयात दाद मागणार

नुकत्याच झालेल्या अर्जांच्या छाननीत झालेले राजकारण व राहिलेल्या त्रुटींबाबत तसेच काही अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसने याविरोधात प्रादेशिक सहसंचालकांकडे अपील करण्याची भूमिका घेतली असून, तेथेही न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्याची तयारी केल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस बाबूराव शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Who Will Congress And Shiv Sena Support In Kisan Veer Sugar Factory Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top