Flamingo | यंदा तरी होणार का फ्लेमिंगोंचे लँडिंग..? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलेढोण : यंदातरी फ्लेमिंगोंचे आगमन होणार का?
कलेढोण : यंदा तरी होणार का फ्लेमिंगोचे लंडिंग..?

कलेढोण : यंदातरी फ्लेमिंगोंचे आगमन होणार का?

कलेढोण : खटाव तालुक्यातील येरळवाडी, कानकात्रे व मायणीतील तलावात दिवाळीनंतर गुलाबी थंडीत येणाऱ्या फ्लेमिंगोंच्या (रोहित) आगमनाची प्रतीक्षा पक्षीमित्र करीत आहेत. उथळ पाण्यात मुबलक खाद्यान्न उपलब्ध होत असल्याने देशी-विदेशी पक्षी तलावात मुक्कामास येतात. त्यांची छबी टिपण्यासाठी छायाचित्रकार, पक्षीप्रेमी पुण्या-मुंबईवरून हजेरी लावतात. गतवर्षी हवामान बदलामुळे फ्लेमिंगोंचे आगमन न झाल्याने यंदातरी फ्लेमिंगोंचे आगमन होणार का? अशी आस पक्षीप्रेमींना लागली आहे.

दुष्काळी खटाव-माण तालुक्यातील येरळवाडी, मायणी, कानकात्रे, सूर्याचीवाडी व देवापूर (माण) या तलावावर दरवर्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात थंडीत फ्लेमिंगो हजेरी लावतात. ते फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत येथे मुक्कामास असल्याने दुष्काळी तालुक्यातील तलावावरील पक्षीसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक हजेरी लावतात. म्हसवडजवळच्या देवापूर ब्रिटिशकालीन तलावात हे पक्षी कमी-अधिक संख्येने हजेरी लावतात.

हेही वाचा: शिर्डी : सुकलेल्या फुलाने राहीबाईंचा सत्कार

यंदा खटाव तालुक्यातील येरळवाडी, मायणी, कानकात्रेत पुरेसा पाणीसाठा झाल्याने देशी पक्ष्‍यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. तर सूर्याचीवाडी क्र.२ (पाटलांचा तलाव) तलावात पाणीसाठा नसल्याने येथे पक्षी निरीक्षणाचा आनंद पक्षीप्रेमींना घेता येणार नाही.

दरवर्षी उत्तरेकडील देशात वाढणाऱ्या थंडीपासून संरक्षणासाठी व अन्नाच्या शोधात देशी-परदेशी पक्षीही तलावावर हजेरी लावतात. या सगळ्यात जेव्हा अग्निपंख हे जेव्हा जमिनीवरून हवेत झेपावतात, त्यावेळी अवकाशात अग्नीच्या ज्वाळा निघाल्याचा भास होतो. त्यांना पाहण्यासाठी व निरीक्षणासाठी कोल्हापूर, सांगली, पुणे आदी जिल्‍ह्‍यातील पक्षीप्रेमी तलावावर हजेरी लावतात. गतवर्षी बदलत्या हवामानामुळे मायणी, येरळवाडी, कानकात्रे व सूर्याचीवाडी तलावाकडे परदेशी पक्ष्‍यांनी पाठ फिरवली होती. मात्र, यावर्षी परदेशी पाहुणे कधी येणार, याची वाट पक्षीप्रेमी पाहात आहेत.

‘सकाळ’कडील आगमनाच्या नोंदी..!

  • २१ नोव्हेंबर २०१२ (येरळवाडी : खटाव)

  • ७ मार्च २०१३ (राजेवाडी : माण)

  • २३ डिसेंबर २०१४ (येरळवाडी : खटाव)

  • ५ फेब्रुवारी २०१५ (येरळवाडी : खटाव)

  • ११ नोव्हेंबर २०१६ (सूर्याचीवाडी : खटाव)

  • २६ नोव्हेंबर २०१७ (येरळवाडी : खटाव)

  • ११ नोव्हेंबर २०१८ (येरळवाडी : खटाव)

  • १२ डिंसेबर २०१९ (सूर्याचीवाडी : खटाव)

  • सन २०२० मध्ये आगमन नाही

loading image
go to top