esakal | बांगडयाचे झालेले तुकडे, रक्ताच्या डागात अफजल खान कबरीजवळ सापडला महिलेचा मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

बांगडयाचे झालेले तुकडे, रक्ताच्या डागात अफजल खान कबरीजवळ सापडला महिलेचा मृतदेह

हातावर पोट असलेल्या कुटूंबावर ऐन दिवाळीत आघात झाला. सालेकर यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ​

बांगडयाचे झालेले तुकडे, रक्ताच्या डागात अफजल खान कबरीजवळ सापडला महिलेचा मृतदेह

sakal_logo
By
अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : किल्ले प्रतापगडावर शेंगा, बोरं विक्रि करणारी संगिता सालेकर वय 50 वर्षे (वाडा कुंभरोशी) या महिलेचा मृतदेह अफजल खानाच्या कबरीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळला. ऐन दिवाळीत या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.14) नोंद झाली आहे.

अनलॉक जाहीर झाल्याने किल्ले प्रतापगड हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. या गडावर येणारे पर्यटकांना शेंगा व बोरं विकून सालेकर पती पत्नी आपल्या कुटूंबाचा चरीतार्थ चालवितात. यासाठी घरातून सकाळी बाहेर पडून सायंकाळी घरी यायचे‌. हा त्यांचा दिनक्रम आहे. वाडा कुंभीरोशी येथील संगिता सालेकर (वय 50) या सकाळी गडावर जाते असे सांगून दाेन दिवसांपुर्वी घरा बाहेर पडल्या. मात्र रोजच्या प्रमाणे त्या सायंकाळी घरी परत आल्या नाहीत म्हणुन त्यांचे पती, दीर व भाऊ यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती काही सापडली नाही. दुसरे दिवशी गावातील देवर्षी यांचेकडे कौल लावला व त्यांनी सांगितलेल्या दिशेला त्यांचा शोध घेतला परंतु तपास लागला नाही. त्यांच्या जवळच्या काही नातेवाईकांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याच दरम्यान तिकडे शोध घेत असलेल्या काही नातेवाईकांना त्यांचा मृतदेह सापडल्याचा फोन आला. त्यानूसार तातडीने तक्रार दाखल करण्यासाठी आलेले नातेवाईक व महाबळेश्वर पोलिस घटनास्थळाकडे रवाना झाले. 

अफजल खानच्या कबरीपासुन 100 मीटर अंतरावर जंगलात संगिता सालेकर यांचा मृतदेह पडला होता. बांगडयाचे तुकडे व रक्ताचे डागही त्यांच्या मृतदेहाच्या जवळपास आढळुन आले. पोलिस उपनिरीक्षक अब्दुलहदी बिद्रि यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने मृतदेहाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह महाबळेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. 

महाबळेश्वर पाचगणीतील लालचुटूक स्ट्रॉबेरीचा दर जाणून घ्या

संगिता सालेकर यांना दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे. त्यांचे पती देखील गडावर शेंगा व बोर विकुन आपले कुटुंब चालवितात. चार रूपये कमवून संगिता सालेकर या देखील कुटुंबास हातभार लावत होत्या. हातावर पोट असलेल्या कुटूंबावर ऐन दिवाळीत आघात झाला. सालेकर यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात या घटनेची सध्या तरी आकस्मित मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली आहे. हा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरी, शवविच्छेदनाचा अहवाल आल्या नंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल.

पाटण आगाराच्या ढकल स्टार्ट बसगाड्यांचा प्रवाशांना मनस्ताप

Edited By : Siddharth Latkar