World Tourisim Day : कोयना पर्यटन पुन:श्‍च हरिओमच्या प्रतिक्षेत

विजय लाड
Sunday, 27 September 2020

प्रेक्षणीय ठिकाणे बंद केल्यामुळे कोयनानगरमध्ये सन्नाटा पसरला आहे. पर्यटनावर उपजीविका असणारा वर्ग आर्थिक विवंचनेत पडला आहे.

कोयनानगर (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सहा महिन्यांपासून अल्पावधीत जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आलेले कोयना पर्यटन बंद आहे. निसर्गाचे लावण्य ओसंडून वाहत असले तरी पर्यटकांची वानवा व बंदीमुळे बहरलेले सदाहरीत कोयना कोमेजले आहे. यामुळे व्यावसायिक उपासमारीचे चटके सहन करत आहेत. शासनाने या पर्यटनस्थळावर घातलेली बंदी उठवावी व पुन:श्‍च हरिओम करून विस्कटलेली कोयनेची गाडी रुळावर आणावी. त्याचबरोबर कोयना धरणाच्या जलाशयात बोटिंग सुरू करून कोयना पर्यटनाला "अच्छे दिन' आणावेत, अशी मागणी स्थानिक लोकांकडून होत आहे. 

कोरोनाचे जीवघेणे संकट कोसळल्यामुळे 20 मार्चपासून शासनाने पूर्णतः लॉकडाउन करून पर्यटकांना बंदी घातली आहे. कोयना पर्यटनाचा आत्मा असणारे कोयना धरण, नेहरू उद्यान व नयनरम्य ओझर्डे धबधबा व अन्य प्रेक्षणीयस्थळे बंद केली आहेत. पावसाळ्यात कोयनेत पर्यटनाला बहर आला असला तरी पर्यटन क्षेत्र बंद असल्याने पर्यटकांची पावले कोयनेकडे वळलीच नाहीत. सहा महिन्यांपासून पर्यटन व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा : उदयनराजे

कोयना विभागातील बहुतांशी लोकांचे जीवनमान पर्यटनावर अवलंबून आहे. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला सह्याद्रीच्या कुशीतील हा अनमोल ठेवा म्हणजे इथला परिसर आहे. त्यामुळे पर्यटनाच्या तीनही हंगामात कोयनेचे सौंदर्य भरभरून वाहत असते. तीनही हंगामात हे ठिकाण पर्यटकांनी "हाउसफुल्ल' असते. परिसरातील सर्वच ठिकाणे पाहण्यासारखी असल्याने व्यावसायिकांना नेहमीच "अच्छे दिन' असतात. कोरोनाच्या महामारीमुळे कोयनानगरमध्ये पर्यटकांना बंदी आहे. प्रेक्षणीय ठिकाणे बंद केल्यामुळे कोयनानगरमध्ये सन्नाटा पसरला आहे. पर्यटनावर उपजीविका असणारा वर्ग आर्थिक विवंचनेत पडला आहे. "वीकेंड डेस्टिनेशन' असणाऱ्या कोयना पर्यटनाला घरघर लागली आहे. ही घरघर थांबवण्यासाठी शासनाने या पर्यटनस्थळावर घातलेली बंदी उठवून पुन:श्‍च हरिओम करून गाडी रुळावर आणावी, अशी मागणी होत आहे.

कोरोना सेंटरमध्ये डॉक्‍टर हजर, औषधे गैरहजर! 

शिवसागर जलाशयात बोटिंगला "ग्रीन सिग्नल'
 

मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटिंग करायला "ग्रीन सिग्नल' दिला आहे. बोटिंग स्पॉट फायनल झाला असला तरी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या पाहणीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. लवकरात लवकर या "स्पॉट'ची पाहणी करून कागदावर तरंगणारे बोटिंग सुरू करावे, ही अपेक्षा कोयनावासीय व्यक्त करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Tourisim Day Koynanagar Ozarde Waterfall Satara News