असाही प्रामाणिकपणा! महामार्गावर सापडलेली दागिन्यांची बॅग अपशिंगेच्या युवकांनी केली परत

प्रवीण जाधव
Wednesday, 25 November 2020

आशिष व कल्याण हे एक बॅग घेऊन पोलिस ठाण्यात आले. वाईला कामानिमित्त जात असताना महामार्गावर ही बॅग सापडल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले, तसेच बॅगमध्ये दागिने असून, ते संबंधितांना परत करा, असेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी ते दागिने पोलिस निरीक्षक सजन हंकार यांच्याकडे दिले.

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर गौरी शंकर कॉलेजच्या समोर सापडलेले सहा तोळे सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत करणाऱ्या अपशिंगे येथील दोघांचा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. 

ऍड. आशिष प्रल्हाद बुधावले व कल्याण नामदेव भोसले (दोघे रा. अपशिंगे, ता. सातारा) अशी बॅग प्रामाणिकपणे परत करणाऱ्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कडगाव (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील यशवंत हरी पाटील हे काल त्यांच्या पत्नीसोबत दुचाकीवरून पुण्याकडे निघाले होते. लिंबखिंड ते गौरीशंकर महाविद्यालय परिसरात त्यांच्या दुचाकीला अडकवलेली बॅग खाली पडली. काही अंतर गेल्यावर त्यांना हे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पाहणी केली; परंतु त्यांना बॅग सापडली नाही. त्यानंतर त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात येऊन बॅग हरविल्याची माहिती दिली. त्याबाबची नोंद झाल्यावर तालुका पोलिसांनी शोध सुरू केला. 

अमेरिकेत भारताच्या सुपुत्रांची हवा! नासात हवामान अभ्यासासाठी आर्य, शिवराजची निवड

याच दरम्यान आशिष व कल्याण हे एक बॅग घेऊन पोलिस ठाण्यात आले. वाईला कामानिमित्त जात असताना महामार्गावर ही बॅग सापडल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले, तसेच बॅगमध्ये दागिने असून, ते संबंधितांना परत करा, असेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी ते दागिने पोलिस निरीक्षक सजन हंकार यांच्याकडे दिले. सुमारे तीन लाख रुपयांचे दागिने असूनही मोहात न अडकता ते प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल हंकारे व यशवंत पाटील यांनी त्या दोघांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Youths Of Apshinge Returned The Gold Bag To The Police Satara News