सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंगराव फरांदे यांचे निधन

प्रशांत गुजर
Wednesday, 16 September 2020

अध्यक्षपदाच्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामे त्यांनी पुढाकार घेऊन केली. विशेषतः जलसंधारणाची कामे करण्याकडे त्यांचा मोठा कल होता. 

सायगाव (जि. सातारा)  : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव बाबूराव फरांदे (वय 75) यांचे पुणे येथे मंगळवारी (ता.15) अल्प आजाराने निधन झाले. आनेवाडी (ता. जावळी) येथे शेती करत असताना त्यांनी समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. आनेवाडीचे 1986 ते 1996 पर्यंत सलग दहा वर्षे सरपंच म्हणून काम करताना गावाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. 

आनेवाडी विकास सेवा सोसायटीचेही सलग दहा वर्षे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. याच काळात कॉंग्रेस पक्षाचे त्यांनी निष्ठने काम केले. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे ते विश्वासू सहकारी होते. सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. बोलक्‍या स्वभावामुळे राज्यभर त्यांचा मोठा जनसंपर्क होता. जिल्हा परिषदेच्या कुडाळ गटातून त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

कांदा निर्यातबंदीबाबत भाजप खासदार उदयनराजे आक्रमक! 

अध्यक्षपदाच्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामे त्यांनी पुढाकार घेऊन केली. विशेषतः जलसंधारणाची कामे करण्याकडे त्यांचा मोठा कल होता. जिल्ह्यातील वाडीवस्तीवर रस्त्यांसह विकासकामे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतीची त्यांना आवड असल्याने अध्यक्षपदाच्या काळात शेतकऱ्यांना विविध योजनांमधून त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या निधनाने आनेवाडीसह जावळी तालुक्‍यात शोककळा पसरली आहे. 

सत्यधर्मी लोकशाहीर : महाराष्ट्रभूषण पुंडलिक फरांदे

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad Ex President Jaysinghroa Pharande Satara News